गुरुवार, १५ मे, २०१४

मनाच्या मनातून..



मुक्त कवडसे मनी दाटले, अलगद उत्कट
स्मरता अवखळ रंगीत काही, काही अस्फूट

मन रमते सहज जरासे मागे मागे
नीतळ अनामिक सुख-दु:खांचे हळवे धागे  


शोधत जाता खोलखोलवर मागोव्यावर
पाऊलखुणांची चाहूल रेषा, उगीच वरवर

मनाच्या मनातून..
वाटते आपलेसे माझे कोणी
असते सोबत माझ्यासाठी, आश्वासक कोणी  


मी वळून बघता कसे अचानक अदृश्य होई
कोणा न कळे, गुपित आमचे तसेच राही              

कसे जुळले हे, ओढ अनामिक अतूट नाते.
कुठली जवळीक, प्रकाश-छाया खेळ मांडते

अवचित येते समोर आणि मी सावध नसते,
समजत नाही कसे कधी पण मर्म गवसते

सुखावते मन, नवजात उमलते कविता त्यातून!

मनाच्या मनातून..
असे ऋतू आणि असे ऋतूंचे बहर सोहळे
निळ्यासावळ्या आकाशी फुलले अगणित रंगांचे जाळे

स्वप्नपागोळ्या थेंब बरसले, रिमझिम रिमझिम
शब्द वहाते अमृत सरिता, झरझर झरझर  

क्षण खुलले, मनी खुलते आस नवी
मनी मानसी जाग येते अशीच खरी!


-अनन्या 



३ टिप्पण्या: