सोमवार, १९ मे, २०१४

जाणीव

कळलेच नाही मला
कधी मी हात सारे सोडले
माणसांसहित गाव माझे
वेगात मागे टाकले
धावतांना असे मी
श्वास मोजून आणले
काळजाचे भाग काही
दूर दूर राहिले.

सोडले जे हात त्यांचे
स्पर्श झाले बोलके
टोचले वाटेत काही
हलकेच त्यांनी काढले
पडत,चुकत चाललो मी,
विश्व नवे घडविले
सोबतीने आज त्यांच्या
पाऊल माझे पडले पुढे.

जरी आज मी आकाशी
उंच उंच विहरतो
दोर हाती घेऊन त्यांचा
जल्लोष मलाही दिसतो
स्वप्न माझे पूर्ण करण्या
स्वत:स ही ते विसरले
काचलेले हात त्यांचे
मी मनाने जाणले.

द्यायचे ते देऊन सारे
दूर उभे कृतार्थ ते
मागणी काहीच नाही,
हिशोब नाही कुठले
परतून आज मागे
त्यांच्यात पुन्हा मी नव्याने
कष्ट्लेले हात त्यांचे
हळू कुरवाळूनी सन्मानिले.

-अनन्या

५ टिप्पण्या:

  1. अनुभवांची जाणीव जोपासणारे जाणते शब्द आहेत तुमचे. छान व्यक्त होता तुम्ही. आपल्याला तर आवडलं बुवा. लिहीत राहा. आवडतात तुमच्या कविता मला.

    आभाळातल्या उंच ठिकाणी पोहोचलेल्या त्या पतंगाला, त्याला तिथपर्यंत नेण्यासाठी ज्यांनी आपले हात काचून घेतले त्यांची जाणीव आहे. ज्यांनी आपल्याला इथपर्यंत आणले त्यांनाच आपल्यापेक्षाही जास्त आनंद मिळतो आहे. आनंद आपल्याला या ठिकाणी पाहण्याचा. बाकी काही नाही. "मागणी काहीच नाही हिशोब नाही कुठले"… सन्मान नेहमी उत्तुंग शिखर गाठ्लेल्यांचा होतो. परंतु त्या शिखरापर्यंत जाण्याची वाट ज्यांनी दाखविली, ज्यांनी त्या प्रवासात सदैव सोबत केली, ज्यांनी बळ दिलं, आधार दिला त्यांचा सन्मान जग करत नाही. तो आपणच त्यांचा करायचा असतो.…… खूप छान.

    तुमचा ब्लॉग मी माझ्या रिडींग लिस्ट मध्ये घेतला आहे.जेणेकरून तुमच्या नवनवीन कविता वाचणं मला सोपं होईल.

    पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा !!!!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुम्ही दिलेली मनमोकळी प्रतिक्रिया आवडली. धन्यवाद!
      कोणत्याही प्रवासात ध्येय महत्वाचं असतंच पण मला त्याहीपेक्षा महत्वाचा वाटतो तो प्रवास.
      एखादं ध्येय साध्य नाही झालं तरी त्या प्रवासातला अनुभव खूप काही देऊन जातो माणसाला.
      आणि तेथे पोहोचण्यासाठी निरपेक्ष मदत करणारे सोबती तर आपला खरा ठेवा असतो.
      ब्लॉग रिडींग लिस्ट मध्ये घेतल्याबद्दल मनापासून आभार!
      -अनन्या.

      हटवा
  2. अगदी बरोबर बोललात. पहा ना, साध्य केलेल्या ध्येयांचा विसर पडू शकतो, पडतोही बहुदा पण त्या ध्येयपूर्तीसाठीचे अनुभव मात्र हरक्षणी सोबत असतात आपल्या. शिकवत असत्तात काहीबाही, हितगुज करतात आपल्याशी नि विशेष म्हणजे अंतर्मुख व्हायला लावतात आपल्याला. आपल्याही नकळत…।

    उत्तर द्याहटवा