सोमवार, २१ एप्रिल, २०१४

लेडीज स्पेशल

सहा पंचावन्नची लोकल
येऊन थांबते धडधडत
नेहमीचेच, अनेक चेहरे
एकमेकींपासून अनभिज्ञ...तरीही सोबत!
एक प्रवास रोजचा...

प्रत्येक चेहरा किती वेगळा, किती देखणा
शब्द, अर्थ आणि अखंड बडबड
रंग, गंध अन् नाद, स्पर्शही
वाहता खळाळता झराच सुंदर
एक प्रवास रोजचा...

अबोल मिटले ओठ स्तब्धसे पापणीआड वादळाचीपडझड 
अलिप्त आठी, नजर बोलकी
गर्दीत एकटे..एकाकी गलबत
एक प्रवास रोजचा...

वेग भिनतसे, जगण्याची धांदल
तेच तेच तरी, सवयीचे अंतर
उघडे डोळे, शांत आतला स्वर
क्षणात साधते एकरूप लय
एक प्रवास रोजचा..

तिची साधना, तिची स्वस्थता
फक्त तिचे असे, हेच काही क्षण
हसतमुख निघे जग जिंकण्या
जगण्याचे बळ करून गोळा

एक प्रवास रोजचा..  

-अनन्या

1 टिप्पणी: