दु:खात इतकं बुडवून घेतलं आहेस तू स्वत:ला की इतर कोणाचंच काहीही
ऐकण्यापलीकडे गेली आहेस.
माझा तरी आवाज पोहोचतोय का ग तुझ्यापर्यंत?
असं स्वत:ला इतकं हतबल, इतकं दु:खी का करून घेतलंस
ग?
कशी घालू मी समजूत तुझी?
तुला आठवतं? आपल्या घराकडे येणाऱ्या रस्त्यावरचं ते छोटंसं झाड बुंध्यावर घाव
घालून कोणी अर्ध्यातूनच तोडून नेलं होतं.
मी विचारलंही होतं तुला, काय वाटलं असेल ग याला? रडत असेल का ते? कोणी तोडत असतांना प्रतिकारासाठी ओरडलं असेल का?
आणि आपलं एकमत झालं होतं की असेलही..नव्हे असेलच. फक्त त्या
क्षमतेच्या ध्वनिलहरी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून ते आपल्याला ऐकू येत
नाही, इतकंच.
नंतर येता जाता त्याच्याकडे बघून वाईट वाटत राहिलं होतं किती दिवस.
जणू काही माझ्यापासूनच कोणी काही दूर नेलं होतं.
तूच समजूत घातली होतीस ना माझी? पण नंतर काही दिवसांनी
त्याच्या त्या वेड्यावाकड्या, तुटक्या, वाळलेल्या बुंध्यातूनच एक दोन हिरवे, पोपटी नाजुकसे कोंब वर डोकावतांना दिसले. कसला आनंद
झाला होता आपल्याला. आणि मग ती लालसर नाजूक छोटी छोटी पानं..किती कोवळी...किती
तान्हुली..हात लावला तरी दुखावली जातील असं
वाटायला लावणारी..किती मोह झाला होता हात लावायचा त्यांना! पण काही गोष्टींचा आनंद
त्यांना दुरूनच बघून घ्यायचा असतो हे तेव्हा समजलं, जाणवलं
होतं आपल्याला!
थोड्याच दिवसात ते झाड नव्या पालवीने भरून गेलं, इतकं की ते कुठून तुटलं होतं हे ही पुसून गेलं.
सखी आज तुझ्याकडे बघून तेच झाड आठवतंय मला. त्याच्यासारखीच झालीय आज
तुझी अवस्था. इतरांचा विचार न करण्यारांची मानसिकता तुला नवी आहे का? इतरांचा विचार करण्याइतके प्रगल्भ मन नसतेच अग त्यांच्याकडे.
पण कोणी विध्वंस करावा आपल्या आयुष्यात आणि आपण प्रेमासाठी किंवा इतर
कशा कशाचा विचार करून तो सहन करत रहावं, यालादेखील मर्यादा असते. हे
प्रेम तर नक्कीच नाही. आणि सहन करणाऱ्याचंच सगळं चुकत जातं जगात. मुळात आपलं
आयुष्य हे फक्त आपल्या स्वत:चंच असतं. कोणी दुसरा त्याच्या स्वार्थासाठी ते
वाकवणार, तोडणार. मग काय आपण ते त्याला करू द्यायचं?
तू त्यातच गुरफटून घेतलं आहेस स्वत:ला. आणि असंच वागत राहिलीस तर हे
जीवघेणं दु:ख पार तळाशी नेऊन ठेवेल तुला. त्यातून बाहेर पड.
बघ तरी, आयुष्य कसं दोन्ही हातांनी तुला कवेत घेण्यासाठी थांबलंय कधीचं!
परवा अग एका छोट्याशा जखमी पक्षाला कावळ्यांनी नको जीव केलं होतं.
आणि दोन त्याचेच भाऊबंद दिसणारे पक्षी इतका आरडाओरडा, आकांत करत त्या कावळ्यांना त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत
होते. सगळ्यांनी त्या कावळ्यांना हाकलायचा प्रयत्न केला पण हे सगळं इतक्या
अडचणीच्या ठिकाणी चाललं होतं की दुरून बघण्यापलीकडे कोणी काही करू शकलं नाही. अखेर
तो बिचारा जखमी जीव.. कावळ्यांनी टोचून मारलं ग त्याला. आणि आक्रमकपणे त्या दोन
छोट्या पक्षांनाही हाकलून लावलं त्यांनी. इतकी कालवाकालव झाली मनात. डोळ्यात पाणी
आलं. खूप राग आला त्या कावळ्यांचा. माझ्याकडून रोज कणकेचा गोळा खाणारा कावळा पण
त्यांच्यात
असेल का? असं वाटलं. खूप वेळ त्या सगळ्या अकांताचा नाद वातावरणात भरून होता.
मग शांतता झाली. खिन्न शांतता. अंधारही पडला. मन अस्वस्थ अस्वस्थ होतं.
दुसऱ्या दिवशी ते दोन छोटे पक्षी निमूटपणे तारेवर बसलेले बघितले. तेच
दोघं असावेत कारण त्यानंतरही दिवसभर ते तिथेच बसलेले दिसले. खूप वाईट वाटलं. वाटलं, आता किती दिवस हे लक्षात राहील यांच्या?
पण मग तिसऱ्या दिवशी काही ते दिसले नाहीत. आणि नंतरही बरेच दिवस
त्यांच्यापैकी कोणीच दिसले नाहीत. त्यांना समजलं असावं बहुदा की इकडे आपल्याला
धोका आहे. स्वीकारलंच त्यांनी आपल्या कुणाचंतरी आपल्यातून जाणं आणि त्यावर आपल्या
परीने उपाय ही शोधला बहुतेक.
यांची दु:खं छोटी आणि आपली माणसांची दु:खं मात्र मोठी असं तर नक्की
नाही ना?
माणसाचं मन त्याचा स्वीकार लवकर करू शकत नाही हे मात्र खरं.
पण खरंच ग असं कोणतंच दु:ख नाही ज्याच्या बाहेर आपल्याला पडता येऊ
नये,आणि हे केवळ
पोकळ अनुभवशून्य शब्द नाहीत, माहितीये न तुला?
एक दीर्घ श्वास घे आणि बघ बाहेरचा ऑक्सिजन शरीरातल्या प्रत्येक कणात
किती चैतन्य आणून पोहोचवतोय ते!
दु:ख आहेच. ते जाणार नाहीच कुठे. पण तू तर जाऊ शकतेस.
त्याचं बोट सोडून तू चालायला तर लाग. बघ तरी, सूर्याचा हा किरण तुला बिलगण्याची किती वाट बघतोय ते. डोळे मिटून
त्याचा स्पर्श तर अनुभव.
आणि हा बागेतला मोगरा बघ ना किती बहरलाय तो.. हातात तर घे ही फुलं.
ओंजळीकडे बघ तरी. किती आतुर आहेत तुझ्या श्वासात एकरूप होण्यासाठी.
शेवटी काय ग, आपण आत्ता जगतोय तो क्षण खरा. त्याला घट्ट मिठी मारायची आपणच. थेट.
जसा असेल तसा स्वीकारायचा यासाठी मन कसं आरस्पानी पाहिजे.
माझ्या वाट्याला फक्त सुखच हवं, असंही नाही आवडणार
आपल्याला. दु:खालाही उत्कटतेने भिडू देत आपल्याला. त्याच्याकडे नीट बघ एकदा, त्याला सामोरी जा. धीरानं घे. त्यातून आपण जे घडतो ना तो अनुभव
आपल्याला शहाणं करून जातो.
बघ इतर कोणासाठीही नाही. अगदी माझ्यासाठीही नको.
तू फक्त स्वत:साठी जग. अगदी भरभरून...समरसून. आपल्या त्या झाडासारखं
पुन्हा उमलून ये! आपला वसंत आपल्याच तर मनात राहतो!
शेवटी आपण किती क्षण जगलो यापेक्षाही कसे जगलो हे महत्त्वाचे आहे ना?
आणि मग असं जगतांना कधीही श्वास थांबोत...काय फरक पडतो सखी?
-अनन्या
-अनन्या
मस्त! सखी हा शब्द वेगळाच आहे.
उत्तर द्याहटवा