मंगळवार, १५ एप्रिल, २०१४

गरज

तुझ्या माझ्यातले नाते
तसे अनेक संदर्भ
कधी अलवार मुलायम पोत
तर कधी सगळाच गुंता
गाठी-निरगाठींचा खोल खोल

यातल्या प्रत्येक क्षणाशी     
बांधली जाते मी
माझ्याही कळत नकळत
आणि उरते, आहे तिथेच कित्येकदा
गुंत्याची सुरवात आणि शेवट
पुन्हा पुन्हा चाचपडत

कितीतरी पुढे निघून जातोस तू
आपल्यातल्या वाढलेल्या अंतराचं
खूप दडपण येतं रे माझ्यावर
सारं काही बाजूला सारून
निकरानं तुला गाठण्यासाठी
किती जोडते आणि सोडते,
खरंच दमून जाते मी!

पण आज....खरं सांगू?
माझी पावलं सोडवून घेतली,
अन् अचानक सुटला सगळा गुंता
आपल्यातलं अंतर...
आता मी तसंच राहू दिलंय
मोकळ्या श्वासाची गरज
मलाही आहे ना, म्हणून!   

 -अनन्या.

३ टिप्पण्या:

 1. तुमचा ब्लॉग पाहिला. चाळला.
  तुमच्याकडे विचार, भावना खूप आहेत. त्या तुम्ही आकर्षकरीत्या मांडण्याचा प्रयत्नही करीत आहात. अद्याप वृत्तबध्द लिहिले नसल्यास अवश्य प्रयत्न करा. कवितेव्यतिरिक्त कथा, काव्यात्म निबंध, कादंबरी हे जे इतर प्रकार आहेत त्यांचाही तुम्ही विचार करावा, असे सुचवितो. लेखन करणा-यांनी इतर फॉर्म अवश्य हाताळावेत त्यामुळे विचारांनीना नवा अवकाश मिळतो. ग्रेस, दुर्गा भागवत यांचे लेखन वाचा.
  निसर्गाबद्दलचा स्नेहाळ दृष्टिकोन दिसतो. निसर्ग आणि माणसाचा संबंध वाचकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.

  शुभेच्छा.

  उत्तर द्याहटवा
 2. पूर्णपणे अनोळखी लोकांकडून आलेली प्रतिक्रिया नेमकी आणि खरी असते.
  तशी ती देणारे तुम्ही पहिलेच म्हणून मन:पूर्वक धन्यवाद!
  ग्रेस, दुर्गा भागवत मला आवडतातच.
  आपल्या सूचना देखील आवडल्या.
  जरूर विचार करीन.
  -अनन्या.

  उत्तर द्याहटवा