रविवार, २९ मार्च, २०२०

एक क्षण स्वतःसाठी...


माणसांना सगळ्यात जास्त भीती वाटत असते ती अनिश्चित गोष्टींची. अंधार नकोस वाटतो. उजेडाचा हलकासा किरणही आधार देणारा,उबदार वाटतो.
त्या प्रकाशात अनिश्चिततेवर मात करता येण्याच्या शक्यता दिसतात आणि माणसं मार्ग काढतातही.
कोणतेही संकट माणसाच्या इच्छाशक्तीपेक्षा मोठे नसते. उलट संकट जितके व्यापक तितकी त्यावर मात करण्याची आश्वासक ऊर्जा मनात निर्माण होते. ज्योतीने ज्योत उजळत जा
ते आणि ती माणसांच्या मनामनातला कानाकोपऱ्यातला अंधार निपटून टाकते.
अशावेळी कितीही आत्मकेंद्री असलेली व्यक्ती तिने ठरवलं तर आपल्या सवयींच्या कोषातून बाहेर पडू शकते. स्वमग्नतेच्या, स्वार्थाच्या भिंतींना तडे जातात. माणूस आपल्या व्यक्तिगत मर्यादा ओलांडून पुढे जाऊ शकतो. ही वेळ असते आयुष्याचे खरे सौंदर्य मी, माझं करण्यात नाही तर एकमेकांच्या सोबतीत आणि सहचर्यात आहे याची नव्याने ओळख करून घेण्याची. कारण संकट व्यक्तीवर येऊ दे किंवा समूहावर किंवा अखिल मानवजातीवर त्या संकटातले आव्हान जसे तीव्र असते तसे त्यावर मात करण्याच्या शक्यताही अनेक असतात. त्यातूनच माणसातील माणूसकी पुन्हा एकदा कात टाकून रसरशीत होण्याची सुरवात होते.
येणारा अनुभव खुल्या मनाने घेण्याचे आव्हान प्रत्येक संकटात असते. इतिहास साक्ष आहे अशी माणसांच्या जगण्याला आव्हान देणारी, माणुसकीची परीक्षा घेणारी अनेक संकटे आपण आजपर्यंत परतवून लावली आहेत. कोणतेही संकट काळाच्या ओघात कधीही टिकलेले नाही. पण त्याच इतिहासकडून आपल्याला विवेकी आणि अविवेकी निवडीचे परिणामही शिकायला हवेत. म्हणजे मग लक्षात येईल की आपल्या प्रत्येकाला या संकटकाळात स्वतःसाठी एक "निवड" करायची आहे. म्हटलं तर ही एक संधी आहे, म्हटलं तर एक आव्हान आहे, आपण त्याकडे कसं बघतो, हे मात्र आपल्या प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.
हीच संकटांची ताकद आहे.
कारण संकटं स्वत:पलीकडे जायला शिकवतात, नव्हे कसं जायचं याचे वेगवेगळे पर्याय शोधायला आणि निवडायला शिकवतात. संकटं संकुचितपणाच्या मानवनिर्मित मर्यादा ओलांडून पुढे जाण्याची प्रेरणा देतात. आपल्या आधी इतरांचा विचार करण्याची बुद्धी अशावेळी आपोआप सुचते. इतरांच्या काळजी घेण्यातच आपलेही भले सामावलेले आहे याचा साक्षात्कार होतो. माणसांची जीवनमूल्ये बदलतात आणि जगण्यावरची अम्लान श्रद्धा दृढ होते.

                                        



माझ्या मते आज ती संधी आपल्याला आहे स्वतःसाठी एक पॉज, एक उसंत घेण्याची. तो घ्यायचा आहे आत्मपरीक्षण करण्यासाठी. आज आजूबाजूचं जग थांबल्यासारखं वाटतंय कारण आपण थोडे स्थीर झालो आहोत. विश्वाची गती अशी कासवासारखी होईल, कधी स्वप्नातही आलं नव्हतं नाही? सतत बाहेर धावणाऱ्या आपल्या शरीराचा वेग अचानक कमी झालाय, पण आपलं मन? त्याने आपला वेग कमी केलाय का? की ते दुप्पट वेगाने कामाला लागलंय? हेदेखील तपासायला हवंय.
ही संधी आहे, धावणाऱ्या मनाला ब्रेक लावून हे शोधण्याची की आयुष्यात जो मार्ग आपण निवडलाय तो आपल्यासाठी आणि आपल्या जीवलगांसाठी योग्य दिशेने जाणारा आहे?
आजपर्यंत निसर्गातल्या पाच तत्त्वांकडून आपण सतत आणि अविरत फक्त "घेत" आलेले आहोत,
निसर्गाला आपण कधी काय दिलंय?
'घेण्यातला' आनंद आपण नेहमीच हक्काने अनुभवतो पण 'देण्यात'ला आनंद अनुभवण्यासाठी आपल्या मनात पुरेशी जागा आहे?
त्यासाठी स्वतःपुरते प्रत्येकाला काय करता येणे शक्य आहे? हे शोधण्याची ही वेळ आहे.
निसर्गतले केवळ सौन्दर्य टिपणारे आणि त्याबद्दल वरकरणी उमाळा वाटणारे आपण प्रत्यक्षात जगण्यातल्या गरजांपायी निसर्गाला किती अपरिमित हानी पोहोचवतो आहोत, हे कधीतरी जाणवले आहे का आपल्याला?
आपल्या गरजा आपण तपासून बघितलेल्या आहेत? आज ती संधी आपल्याला आहे.
कारण जर याबद्दल आजही पुरेसे जागरूक झालो नाही तर आपली इच्छा असो वा नसो त्याच निसर्गतला एक यत्किंचित विषाणू आपल्या अस्तित्त्वालाच कसे आणि किती आव्हान देऊ शकतो, हे आपण सगळेच अनुभवतो आहोत ना?  ही संधी आहे, निसर्गातल्या सौंदर्याबरोबर आपल्या जगण्याशी निगडित असलेले "सत्य" जाणून घेण्याची. त्या सत्याचा आपल्यापुरता स्वीकार करण्याची. मी स्वतःत बदल केला नाही तर माझ्यासमोरच्या परिस्थितीत बदल होईल हे वास्तव समजून घेऊन माझ्या पातळीवर लहान-मोठे बदल आत्मसात करण्याची. आता तरी आपण सगळेच ते मनःपूर्वक करूया?
पाणी,कागद वाचवणे, कमीतकमी कचरा निर्माण करणे यासारख्या आपल्या हातात असलेल्या गोष्टी तरी आपण नक्कीच करू शकतो? इतकी साधी गोष्ट सांगतेय कारण आपल्यापैकी अनेकजण अजूनही याबद्दल जागरूक नाहीत. कचऱ्याचे व्यवस्थापन,पाणी जपून वापरणे, आजूबाजूच्या परिसराचे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून भान ठेवणे हेदेखील आपल्याकडून कोणीतरी करवून घ्यावे लागते?
आज आपल्याला ज्याच्याबद्दल काहीच माहीत नाही अशा एका विषाणूची भीती वाटते आहे,पण अजूनही अनेकांना
त्याबद्दल काहीच न वाटण्याइतपत बेपर्वाई वाटते आहे. परिस्थितीचे गांभीर्य न समजणारे लोक सगळ्यांचा त्रास मात्र वाढवत आहेत. काही लोकं इतकी घाबरलेली आहेत की त्यांना कुठूनही मिळालेली, कोणतीही माहिती अगदी खरी वाटते आहे. काहींना आमचं कोणीही काही वाकडं करू शकणार नाही, असा आत्मविश्वास वाटतोय, काहींना अजूनही आपला दिनक्रम जराही बदललेला नाहीये, हे दाखवण्यात भूषण वाटतेय. दृकश्राव्य माध्यमांना याही परिस्थितीत बातमी चटकदार होण्याचा सोस दिसतो आहे. आपण वापरलेले भडक रंग, आवाज आणि ट्यून कित्येकांच्या हृदयात धडधड वाढवतो आहे,की यासाठीच ‘बातम्या’ तयार होतायेत? दुकानदार मंडळी लोकांना मदत करायची की आपण नफा कमवायचा या गोंधळात स्वतःला सांभाळत आपल्या सेवेचा रास्त मोबदला मिळवण्याचा प्रयत्न करतायेत, रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष परिस्थितीशी सामना करणारे आणि स्वतःची काळजी घेत दुसऱ्यांना सर्वतोपरी मदत करणारे लोकही आजूबाजूला नक्कीच आहेत. यात मेडिकल क्षेत्राशी संबंधित, सुरक्षा आणि इतर महात्त्वांच्या व्यवस्थेशी संबंधित लोकं तर आहेतच पण घरात राहूनही इतरांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे,मार्ग सुचवणारे आणि प्रत्यक्ष मदतीला तत्पर असलेली लोकंही आहेत. एकूणच एकाचवेळी अनेक गोष्टी घडतांना दिसतायेत. माणसांच्याच एकमेकांशी वागण्याची वेगवेगळी रूपं दिसतायेत.
एक यत्किंचित विषाणू दिवसेंदिवस
माणसाच्या जवळ येऊ बघतोय तर त्याला सामोरं जाण्यासाठी आपण संपूर्णपणे तयार तरी आहोत का? या प्रश्नाचा शोध सगळ्या पातळ्यांवर घेतला जातोय. सगळेच सजग झाले आहेत,ही चांगलीच गोष्ट पण हा शोध प्रत्येकजण स्वतःला वगळून घेतोय का, ते आपल्यालाच बघायला हवंय. जगण्यातली जबाबदारी नाकारून कसे चालेल?   
तो शोध आपल्या सगळ्यांना आधी आपल्या रोजच्या जगण्यातच घ्यावा लागेल. आपले जगण्याचे मार्ग आणि पद्धती बघव्या लागतील. त्यामागचे मनातले विचार,समाज,ग्रह,पूर्वग्रह आणि दृष्टिकोन शोधावे लागतील. मग लक्षात येईल या सगळ्याचं मूळ आपल्या आत तर आहे!
या संकटाचा सामना कसा करायचा अगदी याचंही
बळ आपल्यातच आहे. वर हे कसले थर आहेत मग? गरज आहे,त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची.
ही संधी आहे विवेकाच्या काडीने मनातल्या ज्योतीची काजळी काढून टाकण्याची. म्हणजे मनातले अंधारे कोपरे उजळतील, असं करतांना ज्योत विझणार नाही याची काळजी घेण्याची नजाकत आपल्या बोटांमध्ये आहे आणि मनातही.
 स्वतःच्या मनातल्या चांगुलपणावर इतका विश्वास मला वाटतं आपल्या सगळ्यांचाच आहे!
आत्ता आपल्याला शक्य असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू
या, स्वतःला आणि इतरांना होणारा त्रास कमीतकमी कसा होईल हे तर नक्कीच बघूया. माझ्याकडून निसर्गावर एकही ओरखडा उमटणार नाही याची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो. हे संकट आले तसे निघूनही जाणार आहे, त्याची तीव्रता कमी होणार आहे आणि त्यानंतर मागे उरणार आहे या संकटाची गोष्ट.
त्या गोष्टीत मला स्वतःबद्दल अभिमान वाटावा असं काहीतरी मागे उरेल आणि त्याचा प्रकाश माझ्याबरोबर इतरांचंही आयुष्य उजळवून टाकेल ही संधी मात्र आज, आत्ता,आपल्यासमोर असलेल्या
आजच्या क्षणात आहे!
© डॉ. अंजली औटी 

(महारष्ट्र टाइम्स 'मैफल पुरवणी ) 28 मार्च 2020

फोटो स्त्रोत  : गुगल



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा