शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

बदलत्या काळात!




बदलत्या काळात
स्वप्नं बदलली, आकांक्षा बदलल्या
नवी घरटी बांधून 
पिल्ले दूर राहायला गेली
काचेच्या खिडक्या आल्या
तरी नाती मात्र अपारदर्शकच!

बदलत्या काळात
घरं बदलली, घरपण बदलले
नव्या परीघांसोबत
कुटुंबाची व्याख्या बदलली
हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणांची
दाणे टिपणाऱ्या काबुतरांसारखी
अवस्था झाली!

बदलत्या काळात
माणसं बदलली, भावना बदलल्या
अंतराची परिमाणं बदलली
भूतकाळाची पीसे अलगद
काळजाच्या वहीत
दडवून ठेवली!



तरीपण एक विचार येतो,
आपली गरज आपलेपणाची..
उत्तरंही आपल्याकडेच
प्रश्न कितीही पडले तरी! 


-अनन्या

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४

क्षण एक स्वत:शी!


वाहता वाहता क्षणभर 
थांबुनी हलकेच स्वत:शी
गुंफुनी घ्यावा धागा धागा     

मग टाकावे पाऊल पुढती 

स्वस्थ थांबावे अन् मुरवावे
क्षण काळाचे स्वत:त काही
बदलता भवताल घडावे
अधिक मोकळे अंतरंग मनस्वी

मी बदलावे, 
बदलावे तू ही
स्निग्ध ऊबेने अंतरातली
निरगाठही हलकेच सुटावी

सोबत यावा काळ असाही
क्षण काळाचे भेदून अंतर
आज जोडूनी उद्या बनावे
अधिक जाणते,अधिक सुंदर!  
-अनन्या.

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०१४

निरभ्र



जगण्यातल्या जाणिवेचा

थेंब एक एवढासा
 
खोल खोल आत कुठे

क्षणभरातच नाहीसा

अगणित क्षण असे

नि:शब्द, दुखरे खुपरे

तळ गाठतांना आपोआप

शांतावले घाव बोचरे

त्या क्षणांची अबोल बोली

मनभर त्यांचा नाद अनाहत

तरंग उमटे लाटा लाटा

घुमे गाभारा अखंड तेवत

थेंब थेंब जोडून आवेगे

कोसळतो प्रपात अचानक

थरथरत्या जाणिवेत विरघळले

निरभ्र, निळे हसू निरागस.  

 

शनिवार, २ ऑगस्ट, २०१४

सत्य



जिथे विश्वास आहे
तिथे जरूर वाकावे
मोठेपणाचा ‘आब’ जिथे,
मान आपोआप झुकते.  

वृत्ती ज्याची संत,
तो आहे साधू
शुभ्र, विरागी वस्त्राआड आहे,
केवळ संधिसाधू.

पावलोपावली फुलले आहेत
साधकांचे मळे
साध्य,साधन भलतीकडेच
ढोंगाची पाळेमुळे.

वय केवळ मोठे यांचे
म्हणून वाकायची गरज नाही
कर्म मोठे ज्याचे त्याला
असल्या सोपस्कारांची तमा नाही.

मंदिर,मस्जिद, गीरीजाघरात
गर्दीच केवळ, देव नाही
माणसाआतल्या माणूसकीला  
देवत्वाची झूल नाही.

भाव ज्याच्या मनी त्याच्या
वागण्या बोलण्यात देव आहे,   
सत्य ज्याच्या मुखी त्याच्या
पावला पावलात विश्व नवे.

-अनन्या.