रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

देणे समाजाचे!



“कठीण परिस्थितीशी सामना कसा करायचा याचा निर्णय नेहमीच आपल्या हातात असतो.” हे कितीही खरे असले तरी आव्हानात्मक परिस्थिती अचानक समोर आली की त्यावेळी मनात प्रभावी असलेल्या भावनांच्या आहारी आपण जातो. आपल्यापैकी काही जण मात्र याच भावनांची उर्जा वापरून स्वतःसाठी आणि इतरांसाठी आश्वासक पर्याय शोधू शकतात. आयुष्यातल्या संकटकाळात स्वतःला सावरून इतरांचा विचार करणे सगळ्यांनाच कुठे जमते?  पण ज्यांना जमते ते सगळे लोक मुळातच असामान्य असतात का? तेही आपल्यासारखेच असतात. त्यांनाही भावना असतात. मग नेमक्या कोणत्या क्षणी ते दु:खाच्या क्षणांवर मात करून पुढे जातात? असे काय घडते की ते इतर सगळ्यांसारखे न वागता काहीतरी वेगळे वागून असामान्य ठरतात?
यासाठी एक गोष्ट सांगते, वीणाची. एक साधी मुलगी. सर्वसामान्य लहानपण आणि तरुणपण अनुभवलेली. एक साधी गृहिणी आपल्या घरावर,संसारावर आणि माणसांवर मनापासून प्रेम करणारी. दिलीपने सुरु करून दिलेला ‘गिरीसागर टूर्स’चा पर्यटनव्यवसाय सक्षमतेने सांभाळणारी प्रेमळ पत्नी. बाळ होण्याची वाट बघणं, हाच काय तो त्यांच्या आयुष्याचा संघर्ष. वयाच्या तिसाव्या वर्षी वीणाला दोन जुळ्या मुली झाल्या. पूरवी आणि सावनी. कौतुकाचे आणि आईपणाच्या नव्या नवलाईचे आठच दिवस संपत नाही तोच या कुटुंबावर एक संकट कोसळले. पूरवीला फणफणून ताप आला. बघताबघता तो मेंदूपर्यंत पोहोचला. ‘मेनिंजायटिस’ निदान होऊन त्या छोट्याशा बाळाला कायमचं मानसिक आणि  शारिरीक मतिमंदत्व आलं.
बाळाला जराही काही झालं की आईचा जीव अगदी कासावीस होऊन जातो पण ती काही ते दुखणं आणि आजार वाटून घेऊ शकत नाही. पूरवीला सतत फिट्स येत असत. एकेका दिवसात सत्तर ते ऐंशीवेळादेखील फिट्स येत. ते नुसतं बघणंही कठीण होई. इथूनपुढच्या प्रवासाच्या,बाळाच्या काळजीने वीणा हबकून गेली. बाळ काहीच दिवसांचे सोबती आहे,असे डॉक्टरांनी सांगितल्यावर तर तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला. मानसोपचारांची मदत घ्यावी लागली.  पण ती लवकरच सावरली. मुलींना सांभाळण्यासाठी त्यांची सगळी शक्ती पणाला लागली. पूरवीसाठी योग्य मार्गदर्शन घेण्याची आणि सावनीच्या जगण्यावर, वाढण्यावर घरातल्या वातावरणाचा कोणताही प्रभाव न पडता तिच्यातल्या नैसर्गिक हुशारीला आपल्याला पूर्ण न्याय देता येण्याची गरज त्यांच्या लक्षात आली. रोजचा दिवस एक वेगळे आव्हान होते. कोणाची मदत मिळेल? शोध सुरु झाला.
त्यादृष्टीने काम करणाऱ्या सामाजिक संस्था आहेत का म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातातल्या अनेक सामाजिक संस्थाना भेटी दिल्या गेल्या. वेगवेगळ्या संस्थांच्या भेटींमधून अनेक अनुभव त्यांना आले.काही चांगली लोकं,संस्था भेटल्या त्यांची मदतही झाली. तर कधीकधी पैसा, वेळ वाया गेला आणि वर मनस्ताप वाट्याला आला. त्यातल्याच काही संस्था अशा होत्या की कोणत्याही बाह्य मदतीशिवाय त्यांचे खरोखरच चांगले काम स्वनिर्मित फंड॒सच्या तुटपुंज्या मिळकतीवर कासवाच्या गतीने का होईना पुढे नेत होत्या. त्यांचे प्रामाणिक काम समाजासमोर येण्याची गरज दिलीपना जाणवली. कारण समाजातील अनेकांना चांगले काम करणाऱ्या लोकांना,संस्थांना मदत करण्याची प्रामाणिक इच्छा असते, पण मग असे दाते आणि खरे गरजू यांची सांगड,भेट योग्यवेळी व्हायला हवी, त्याचा अनेकांना खरंच उपयोग होईल. प्रत्यक्ष अनुभव घेऊन दिलीपचे मन स्वस्थ बसेना,त्यांना याबद्दल खूप कळकळ वाटू लागली.
                                 

               
                              
दिलीप आणि वीणा दोघांच्याही सामाजिक जाणिवा प्रगल्भ होत्या. समाजातील अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याच दरम्यान दिलीप एक प्रदर्शन बघण्यासाठी गेले आणि त्यांच्या मनात अशा संस्थांचे कार्य समाजासमोर येण्याचा ‘प्रदर्शन’ हा सगळ्यात चांगला मार्ग असू शकतो, हा विचार आला. त्यांनी मांडलेली ही कल्पना वीणालादेखील खूप आवडली. दोघांचे त्यावर विचारमंथन झाले. निर्णय घेतले गेले आणि मग दोघांनी आपली ही कल्पना अनेकांना ऐकवली. ओळखीच्या लोकांनी,मित्र-मंडळींनी ती उचलून धरली. अनेकांनी जमतील तसे पैसेही देऊ केले त्यात काही पदरचे पैसे घालून 2005 साली असे अनोखे प्रदर्शन पुण्यात भरवले गेले. संस्थांनी त्यांची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे लोकांना सांगायची, कार्याचे फोटो आणि माहिती यांचे प्रदर्शन असे केवळ त्याचे स्वरूप होते. लोकांचे,लोकांसाठी असलेले काम लोकांपर्यंत केवळ पोहोचवायचे. कोणतीही मागणी नाही. खरेदी-विक्री नाही. ज्यांना मदत करावीशी वाटेल त्यांनी थेट त्या संस्थेला संपर्क करायचा. असे आगळेवेगळे प्रदर्शन लोकांनी पहिल्यांदा बघितले. उस्फुर्तपणे मदत केली. यात अनाथ,अपंग मुलांसाठी,वंचीत समाजघटकांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था होत्या.   
या प्रदर्शनाचे नाव ठेवले “देणे समाजाचे” यात खरोखरच समाजाचे ऋण त्याला परत करण्याचा सच्चा हेतू होता. असे प्रदर्शन एकदाच भरावून त्याचा फायदा नाही तर दरवर्षी हे घडून यायला हवे याची प्रेरणा मिळाली. उत्साह वाढला. दोघांनी प्रत्यक्ष फिरून अशा गरजू संस्था वर्षभरात शोधून काढून प्रदर्शनासाठी त्यांची निवड करण्याचे काही निकष ठरवले गेले.       
पूरवीसाठी त्यातील काही संस्थांमुळे खरंच मदत झाली. वेगळी समज,दृष्टीकोन विकसित होत गेले. निर्णयांमध्ये सुलभपणा आला. पण अनेक गोष्टींची घडी नीट बसतेय तोच अचानक वीणाला अंतर्बाह्य हलवून टाकणारा एक मोठा धक्का बसला. 2008 सालच्या प्रदर्शनाची दोघेही जोरात तयारी करत होते, केवळ पंधरा दिवस बाकी होते आणि ऐके दिवशी रात्री झोपेतच दिलीप अचानक हे जग सोडून गेले. नियतीचा हा घाव निश्चितच मोठा होता. छोटेसे घर या वादळात उन्मळून पडले. वीणाच्या दु:खावर कोणी काय समजूत घालावी?
दु:खाने सैरभैर झालेल्या वीणाने ठामपणे यावर्षीचे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला. हाच तो क्षण ज्या क्षणी इतर कोणीही हातपाय गाळून दु:खात बुडून जाईल त्या क्षणी आपल्या भावनांवर मात करून वीणा वेगळं वागली. निर्णय भावनांनी नाही तर बुद्धीने घेतला आणि त्यानंतर तिचे आयुष्यच बदलून गेले. दोघांनी एकत्र बघितलेले स्वप्न पुढे नेण्याच्या निश्चयाने तिने उभारी धरली,कुटुंबातील इतर सदस्यही मदतीसाठी पुढे आले आणि त्यावर्षीचे प्रदर्शन ठरल्याप्रमाणे पार पडले.
सगळ्या जबाबदाऱ्या वीणाने संपूर्ण ताकदीने सांभाळायला सुरवात केली. यात शरीरापेक्षा मनाची ताकद जास्त मोलाची ठरली. एकीकडे पूरवी आणि सावनी मोठ्या होत होत्या. महाराष्ट्रभर दौरे करून संस्थांना भेटी देणं,लोकांच्या संपर्कात राहणं हा सगळा वाढलेला व्याप सांभाळणं तसं कठीण होतं पण इथेही तिने आपल्या बुद्धीचा कौल मानला. खऱ्या सामाजिक कामाचा आव आणता येत नाही, त्यासाठी दिवसरात्र एक करावे लागतात. अनेक व्यक्तिगत गोष्टी दूर साराव्या लागतात. इथे तर घर आणि व्यवसाय दोन्ही तारेवरची कसरत होती. दोन्ही पातळ्यांवर ती प्रत्यक्ष हजर असण्याची गरज होती. तरीही “देणे समाजाचे” कार्यक्रम पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेणे खूप जास्त आव्हानात्मक होते. ‘झेपेल तितकेच कर’, ‘आधी घर सांभाळ,लष्कराच्या भाकऱ्या आता नको” यासारखे सल्ले मिळाले नसतील तिला, असे कसे होईल? अडचणी येत गेल्या आणि मार्गही निघत गेले. संकटं येत गेली पण निश्चयाचे बळ कमी पडले नाही. अनेक लोकं या चळवळीला जोडली जात होती. 2010मध्ये या सगळ्या कामामागची प्रेरणा असलेली पूरवी हे जग सोडून गेली. पण आता वीणाचं ‘आईपण’ अधिक व्यापक झालं होतं. सामाजिक मातृत्व स्वीकारलं होतं, थांबणं शक्य नव्हतं आणि तिला थांबायचं नव्हतंही. काम सुरूच राहिलं.
ह्यावर्षी पंधरावे वर्ष आहे ‘देणे समाजाचे’प्रदर्शन पुण्यात येत्या २० तारखेला भरते आहे. आता ते केवळ प्रदर्शन नाही तर एक  ‘चळवळ’ झाली आहे. यावर्षीपासून हे प्रदर्शन मुंबईतसुद्धा आयोजित केले गेले. यातून आजपर्यंत एकशेपासष्ठपेक्षा जास्त सामाजिक संस्थाचे कार्य समाजासमोर आले आहे. अनेक दात्यांनी यथाशक्ती त्यांना मदत केली आहे. काहींनी श्रमदानसुद्धा केले आहे. करोडो रुपयांची मदत आजपर्यंत थेट उपलब्ध झाली आहे. वीणा गोखले आजही सामाजिक संस्था आणि समाज यांच्यातील केवळ एक दुवा म्हणून काम करतात. आजही ती आपल्या सगळ्यांसारखीच एक साधी स्त्री आहे. एक प्रेमळ आई आहे, एक कर्तबगार व्यावसाईक आहे आणि समाजभान असलेली अत्यंत पारदर्शी,प्रामाणिक व्यक्तीदेखील आहे.  “देणे समाजाचे” असले तरी आपणही याच समाजाचा एक भाग आहोत, म्हणून आपलेही आहेच की!
वीणाचे प्रेरणादायी आयुष्य आपल्याला इतकी प्रेरणा तर नक्कीच देतेय!
  © डॉ. अंजली अनन्या 
   
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा