Wednesday, 11 September 2019

एकरूप

पावसाच्या थेंबानी अतोनात उमललेली, फुललेली सृष्टी आजूबाजूला. सवयीच्या 'मी','माझं' या अस्तित्वखुणा मग हलकेच विरघळतात. मन स्वच्छ,निरभ्र होत जातं. विचार,भावना हळूहळू निवायला लागतात. हिरव्या रंगाची जादू मनावर गारुड करते. हलके हलके वाहणाऱ्या वाऱ्यात शरीराचे भान कधी विसरते, कळत नाही. त्याचाच एक भाग झालो की उलगडते एक अनोखे विश्व..विविध आकारांचे, नादांचे, रंगांचे,वासांचे आणि स्पर्शाचे. जाणिवेचा अनोखा प्रवास सुरु होतो.

परस्परांत मिसळणारे, एकमेकांना पूरक असणारे जग...डोंगर,नद्या,झरे,दगड,माती, कितीतरी वनस्पती,फुलं,झाडं,पक्षी आणि या सगळ्यांना कवेत घेणारी असते आभाळाची सोबत.. चिमुकल्या रान फुलापानांचे, कृमीकीटकांचे,प्राण्यांचे जगणे समजू लागते. बरोबर असलेलं कोणी त्यांची नावं सांगत असतात..माझ्या काही ती फारशी लक्षात रहात नाहीत. त्यांच्या जगण्यातली उर्जा मात्र मला स्पर्श करते. त्याचं असणं मला आश्वासक वाटतं. अंतर्मुख व्हायला होते. दृष्टी विस्तारते. मातीच्या रंगाने आणि गंधाने मला वेढून घेतलेले असते.मातीच्या कणाकणात फुलणारे जीवन बघितले की माती मला नदीसारखी ‘प्रवाही’ वाटते. जीवन उमलण्यातले आणि विलीन होण्यातले सातत्य. या प्रवाहाशी आपलंही नातं आहे ना?

   डोंगरकड्यावरून आवेगाने झेपावणारे पाणी अवनीच्या कुशीत शिरते आणि ती नखशिखांत बहरून जाते. कणाकणात प्रेम रुजतं. हिरव्यागार गवताची मृदू,मुलायम लोभस थरथर मातीच्या रोमरोमात उमटते. जगण्याचा नुसता उत्सव सुरु असतो अवघ्या आसमंतात! निसर्गाचे आर्जव मनात उमटणार नाही असे कसे होईल? जंगलवाटांची अतोनात ओढ लागते. आवेगाने वाहणाऱ्या शुभ्र पाण्याच्या गारव्याची, ओल्या वाऱ्याच्या मनमोकळ्या स्पर्शाची आस लागते. मग पाय शोधत जातात कितीतरी अस्पर्शित निसर्गवाटा आणि मी समर्पित..त्या क्षणांना संपूर्ण शरण जाते.   

   निसर्गातला प्रत्येक क्षण एक वेगळा अनुभव असतो. आपण केवळ साक्षी असतो. इथे काहीही आपण बघण्यासाठी घडत नसतं. उघड्या डोळ्यांनी आणि मनाने आपण त्याचा भाग झालो की आजूबाजूला असलेल्या कितीतरी गोष्टी दिसतात,जाणवतात. साद,प्रतिसादांची सृष्टीची भाषा समजत जाते. आपल्या दृष्टीचा,मनाचा,जाणीवेचा परीघ आपोआप विशाल होतो..सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आनंद घ्यायला शिकतो, अनपेक्षित क्षणाचा अनुभव असा याचक होऊन घेतल्यावर मग समजतं ‘घेणं’ किती सुंदर असू शकतं ना?

सौंदर्याचं माप आपल्या ओंजळीत पडतांना त्यातल्या चैतन्याचा असा काही लखलखीत स्पर्श आपल्याला होतो की त्यातल्या उर्जेने आपण अंतर्बाह्य बदलून जातो. मनाचा डोह शांत, तृप्त, समृद्ध होत जातो. जे माझ्यात आहे तेच या चराचरात सामावलंय या अनुभूतीचा सहजभाव मनोमन उमगतो आणि मग जाणवते निसर्गाची लय माझ्याही अंतरंगात आहे. माझ्या श्वासात आहे,रक्तातून वाहते आहे, या श्वासाने तर मी आजूबाजूच्या अनंताशी जोडलेली आहे हे जाणवून कमालीचं मुक्त वाटतं आणि निसर्गनियमांशी असलेली जगण्याची बांधिलकी उमजत जाते. विलक्षण आहे हे वाटणं! तृप्त,कृतार्थ..आयुष्याबद्दल,प्रवाहाबद्दल आणि सहज वाहण्याबद्दल कमालीचा आपलेपणा वाटतो.

परवा अशाच एका वाटेवर कसलीतरी अनामिक ओढ वाटून पावलं रेंगाळली.  पक्षांची नादमधुर किलबिल, झाडांच्या पानांचा वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होणारा आवाज यातूनही अगदी जवळ असलेल्या झाडीत हलचाल जाणवली. एक देखणा मोर समोर. आपल्याच नादात मग्न. त्याच्यापासून थोड्या अंतरावर जराशा मोकळ्या जागेत गेलो. आता आम्ही त्याच्यापासून दहा बारा पावलं दूर. निसर्गाने कसली किमया केलीये ना त्याला बनवून? मानेवरचा निळा रंग, डोक्यावरचा सुंदर तुरा आणि काळेभोर डोळे. असं वाटलं तो आणखी पुढे येणार नाही, पण तो आमच्या दिशेने हळूहळू चालत पुढे आला आणि तिथेच असलेल्या एका उंच खडकावर बसला. आता त्याचा पिसारापण दिसत होता. त्याने आम्हाला नक्कीच बघितलं. प्राणी,पक्षी धोका लगेच ओळखतात. शक्यतो माणसांपासून दूर राहतात. त्याला आम्ही काही करणार नाही हा विश्वास वाटला असावा. किती विलक्षण सुंदर होता तो! क्षणभरच त्याचा उमललेला पिसारा बघण्याची इच्छा मनात उमटली. आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणात आम्हाला तो अद्भुत क्षण अनुभवता आला. आपला लावण्यपिसारा फुलवून तो त्याचा तो मोहक नाच! प्रियेची आराधना,तिला घातलेली साद..पापणीही न हलवता ते सुंदर क्षण आम्ही वेचत होतो. निसर्गाचा तो चमत्कार नजरेसमोर साक्षात साकार होत होता.
                               


निसर्गातला प्रत्येक क्षण वेगळा आणि काहीतरी देणारा असतो. आमचं त्या नेमक्या क्षणाला तिथे असणं त्याने सहजतेने स्वीकारलं आणि त्या सुंदर क्षणांचं दान घेऊन मन नतमस्तक झालं. पाच-सहा मिनटात पिसारा मिटवून तो नुसताच इकडे-तिकडे फिरत होता. त्याला तसं बघणंही विलोभनीय होतं. ते जग त्याचं होतं, त्याच्या विविध अदा बघतांना आमचं मन भरणार नव्हतंच. आम्ही तिघे ओल्या जमिनीवर सरळ मांडी घालून बसलो होतो. 
        


आता निघूया असं एकमेकांना खुणावलं तितक्यात त्याने पुन्हा एकवार प्रियेला साद घातली आणि निमिषार्धात पुन्हा एकदा पिसारा संपूर्ण फुलवून त्याची पावलं थिरकायला लागली. हा क्षण अगदीच अनपेक्षित होता. ते अप्रतिम दृश्य, ती वेळ..निसर्ग मुक्तहस्ते सुंदर क्षण देत होता! लांडोर नक्की झाडीत असणार आणि त्याचा नाच बघत असणार. तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याचं असं रोमरोम  फुलूवून नाचणं,खरंच कमाल वाटली. डोळे भरून त्याला मनात साठवलं आणि त्याची प्रणयसाधना परिपूर्ण होऊ दे,अशी मनात इच्छा करून त्याचा निरोप घेतला.
मन भावविभोर झालं होतं. ही भावसमाधी मोडूच नये,असं वाटत होतं. आज मिळालेलं निसर्गाचं हे दान इतकं परिपूर्ण होतं की चराचराबद्दल,आयुष्याबद्दल कृतज्ञतेने मन भरून आलं..आंतरिक आनंदाची लय निसर्गाशी जोडलेली असण्यातल्या अनुभवात ‘माणूस’ असण्यातला अहंकार कधीच विलीन होऊन गेला.
© डॉ अंजली अनन्या 
# कॅलिडोस्कोप
(फोटो सौजन्य :सतीश कुलकर्णी )
        


No comments:

Post a comment