सोमवार, १६ जुलै, २०१८

काही अनुत्तरीत प्रश्न




तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
अजूनही हॉस्पिटलमध्येच होती.
गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वार्थाने दूर असलेल्या तिच्या तिघीही बहिणी तिच्या जवळ होत्या.
त्यांना समजल्यावर त्या धावत आल्या.
माहेरचं बाकी कोणी आता नव्हतंच तिचं यांच्याशिवाय.
लग्न होईपर्यंत सगळ्यांचे एकमेकींशी चांगले संबंध होते पण नंतर ते काळाच्या ओघात आणि व्यस्ततेत अगदी फॉर्मल झाले. लग्नकार्याला भेटणे आणि क्वचित कधीतरी केलेला फोन यापलीकडे एकमेकींशी संवाद नव्हता.
पण रमेशचा फोन गेला आणि त्या ताबडतोब आल्या..मनात काळजी..भीती आणि अस्वस्थता घेऊन गेले पाच दिवस त्या सीमाच्या उशापायथ्याशी होत्या..
अजूनही काय असं घडलं की सीमा इतक्या टोकाला पोहोचली..हे कोणालाच समजलेलं नव्हतं..
त्यांना कमालीचं अपराधी वाटत होतं..असं कसं आपल्या बहिणीकडे आपलं दुर्लक्ष झालं..बोलून कोणी काही नव्हतं पण त्यांचे चेहरेच सगळं सांगत होते..

                                              




रमेश बडं प्रस्थ, मित्राच्याच हॉस्पिटलमध्ये सीमावर उपचार सुरू होते.
आता सीमाच्या जीवाचा धोका टाळला होता पण तिच्यासमोर कोणीही हा विषय काढायचा नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते.
आठव्या दिवशी डॉक्टरांनी घरी सोडले..रमेश पण धास्तावलेल्या मनस्थितीत होता..एकमेकांशी नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होते सगळे पण कोणालाही स्वस्थता नव्हती..
डॉक्टर घरी आले आणि ठरल्याप्रमाणे त्याने अगदी सावकाश सीमाच्या मनाचा अंदाज घेत तिला बोलतं केलं..
सुरवातीला नीट उत्तरं देणारी सीमा..काही दिवसांत हळूहळू सांगायला लागली..
रमेश आणि तिच्या लग्नाला झाली चौदा वर्ष..लग्नानंतर आठ वर्ष दोघांमध्ये सगळं व्यवस्थित होतं पण गेली सहा-सात वर्ष रमेश आणि सीमा एका घरात राहूनही जसे एकमेकांना अनोळखी होते..रमेश तिच्याशी एक शब्दही बोलत नसे..तिने प्रयत्न केला तरीही.. एकाच रूममध्ये झोपणंदेखील बंद केलं होतं त्याने..या संपूर्ण अलिप्ततेमागचे कारण समजेना .. तो तिच्या प्रश्नांची उत्तरं देई..तीही अगदी त्रोटक..असे काय झालेय की तू माझ्याशी असा वागतो आहेस? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सीमाला कधीच मिळालं नाही..मग ती देखील आधी अहंकार, मग स्वाभिमान आणि मग हताशा..या सगळ्या मानसिक टप्प्यांवर अपरिहार्यपणे गेली..
कधी तिला वाटे की येईल परत..जातोय कुठे?पण असे झाले नाही..
तिने त्याचे मन दुसऱ्या कोणात गुंतलेय का हे शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या विश्वात या कशाला जागाच नव्हती..तो..त्याचा व्यवसाय आणि वाचनाचा त्याचा छंद..तो पुस्तकवेडा होता..त्यात तो स्वतःलाही विसरून जाई..
त्यामुळे दुसऱ्या कोणाशी संबंध हे त्याच्या बाबतीत तरी शक्य नव्हते.
त्यांना मूलबाळ नाही..म्हणून फार जबाबदाऱ्या नाहीत..भरपूर आर्थिक सुबत्ता.
या परिस्थितीला कसे सामोरे जावे तिला कळेना..तिने स्वतःला वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवायला सुरवात केली..इतक्या दिवस त्याच्याभोवती फिरणारं तिचं विश्व..जे काही केलं ते दोघांनी सोबत..म्हणून तर सगळ्यांपासून तुटून ती संसारात रममाण झाली होती..आता अचानक एकटेपण आल्यावर ती धडपडत का होईना स्वतःला सावरायला शिकत होती..
एकेक दिवस ओझं झाला तिला..बरं घरातल्या नोकर माणसांसमोर, कोणी आलं-गेलं त्यांच्यासमोर रमेश असं दाखवायचा की काही झालेलंच नाही..
                  



वयाच्या पस्तिशीत शरीर आणि मनाच्या सगळ्याच गरजा अजूनही जाग्या असतांना नवऱ्याच्या या वागण्यापुढे ती हतबल झाली..
रोज तो बेडरूममध्ये येण्याची ती वाट बघे आणि रोज रडत रडत झोपून जाई..
बरं कोणी आल्यावर तो बेडरूममध्ये झोपायला येई, पण बेडच्या अगदी त्या टोकाला झोपे..जणू कोणी परपुरुष आहे..ते बघून तिच्या मनावर आघात होई..मनाला लाख वाटलं त्याच्या जवळ जावं, तरी तिचा स्वाभिमान तिला तसे करू देत नसे..
भांडण करण्याचे दोघांचेही स्वभाव नव्हते.
मग काय तर फक्त घुसमट..नुसती प्रतीक्षा आणि जीवघेणी उपेक्षा..
दिवस जाता जात नसे..
मन रमवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांना जा..वाचकगटात जा..वेगवेगळ्या संस्थांमधून काही उपक्रमांमध्ये सहभागी हो..असे तिचे सुरू झाले..
माणसांशी जोडले गेल्यासारखे वाटायचे..वेळ निघून जायचा..पण हे सगळे उपाय वरवरचे,तात्पुरते ठरत..
तिचं दुःख, एकटेपण मनातल्या मनात वाढत चाललं..
समोर सगळं आहे आणि मिळत काहीही नाही अशी अवस्था.
बरं, कोणाला काही सांगायला जावं तर कोण समजून घेणार? आजपर्यंत इतर कोणाशी इतकं मनाचं नातं जोडलेलंच नाही..तिचं संपूर्ण आयुष्य फक्त रमेश आणि घर.
नवरा बायको मधला संवेदनशील विषय. कोणाला सांगणार आणि काय सांगणार? खरा प्रोब्लेम समजून घेण्यापेक्षा नको ते सल्ले ऐकून घ्यावे लागतील..
आपलं शिक्षण,बुद्धिमत्ता,रूप..क्षमता सगळ्याचा विचार करून अपमानाने तिचं मन आणखी आणखी पाताळात जाई..
कधी कधी संताप होई..विशेषतः ज्यावेळी शारीरिक आणि भावनिक गरज अनावर होई.."काय कमी आहे माझ्यात? मी या गरजा कुठे पूर्ण करायच्या?" कशासाठी लग्न करतो मग माणूस? सगळं असून काहीही नसण्यासाठी? कोणाला सांगायचा हा कोंडमारा? फक्त स्वतःचा विचार करणाऱ्या, आपल्याच विश्वात रमणाऱ्या लोकांनी सहजीवनाची पायरी चढावीच का मग?    
समाज, लग्नसंस्था..सगळं तिला फार बेगडी वाटे. आयुष्य पिंजरा झालं. सुटकेचा मार्ग दिसेना.
दिवस, दिवस काही सुचून फक्त मूव्ही बघायचे, फेसबुकच्या जगात रमायचं आणि काही सुचून सतत खायचं..वजन वाढायला लागलं..दोन वर्षात 17 किलो वाढलं..
आता मन ठीक नाही म्हणून शरीर ठीक नाही आणि शरीर ठीक नाही म्हणून मन ठीक नाही..दुष्टचक्र सुरू झालं..
तिच्यात झालेल्या सगळ्या बदलाशी रमेशचा जणू काहीच संबंधच नव्हता..
एक दिवस खूपच त्रास झाला म्हणून सीमा डॉक्टरांकडे गेली तर डायबेटीस झालाय हे समजले..मनाने अजूनच खचली मग ती..
इतकी खालावली मानसिक स्थिती की असे जगण्यापेक्षा मेलेले बरे..असे वाटले आणि
मग पुढे काय झाले तिचे तिलाच समजले नाही..तिचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि सगळं रामायण घडलं..
रमेशला ज्यावेळी हे समजलं त्यावेळी त्याच्या लक्षात आपली चूक आली..सीमा स्वतःला इजा पोहचवून घेण्याच्या टोकापर्यंत जाईल असे त्याला वाटलेच नाही कधी..
त्याचाच सांसारिक गोष्टींमधला रस कमी कमी होत जाऊन पूर्ण थंडावला होता..
तिच्या जवळ जाणं नकोसं वाटे..मग तो तिला टाळायला लागला..स्वतःला आणखी गुंतवून घेऊ लागला..कोणी घरी आलं तर त्यांच्यासमोर सुद्धा नाटक करणं जीवावर येई त्याच्या पण तिला सोडून देऊन आपण कुठेतरी निघून जावं तर ते त्याला शक्य नव्हते.
त्याला वाटलं उरलेलं आयुष्य असंच निघून जाईल..शांततेत..सोबत सोडली तर बाकी सगळं पुरवतोच आहे की मी तिला..
पण या प्रसंगाने त्याचे डोळे उघडले..
तिला गमावलं तर आपल्यापाशी काहीही उरणार नाही याची स्पष्ट जाणीव झाली..
बहिणींनीही त्यांची चूक मान्य केली..आपल्याच जगण्यात माणसं इतकी व्यस्त होतात की जवळच्या लोकांची देखील दखल घेऊ नये?
म्हणजे एका सुशिक्षित आणि सुस्थितीतल्या कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी काहीही सुसंवाद नव्हता..मनं कोसो दूर गेलेली होती..नाती पोकळ झाली होती.जगण्याचे मार्ग एकेकटे होते..आपल्या जवळच्या व्यक्तीला त्याच्या वागण्याचे कारणसुद्धा विचारता येण्याइतका मोकळेपणा, जवळिक इतक्या वर्षांच्या संसारानंतरदेखील एकमेकांमध्ये नसेल तर दोष व्यक्तींच्या स्वभावाचा आहे.
लग्नाचा रस्ता एकमेकांच्या शरीरापर्यंत सहज पोहोचतो पण मनापर्यंत पोहोचतो का?
वर्षानुवर्ष आपण ज्यांच्यासोबत एकाच घरात राहतो त्या व्यक्ती आपल्या खरोखरच जवळच्या होऊ शकतात का?
सोबतमहत्वाची असते एकत्र जगतांना..जर आपण आपल्या घरातल्याच लोकांशी संवेदनशीलतेने वागू शकलो नाही तर इतरांना काय माणूसकी दाखवणार?
माणसा माणसातली नाती एकमेकांसाठी गरजेची असतात..पण ती वाहत्या पाण्यासारखी खळाळती, प्रवाही असतील तरच आतून समृद्ध होतात. नवरा-बायकोच्या नात्यातदेखीलमैत्रफुलू शकण्याच्या शक्यता असतात.
असं मैत्र झालं की स्पर्श बोलके होतात आणि शब्द मूक,मग अशी शांतता दोघांचंही आयुष्य सुंदर करणारी असते..आणि सुजाण, शहाणी असते..
पुस्तकांची भाषा सहज समजली रमेशला आपल्या बायकोच्या मनातले नैसर्गिक भाव,भाषा मात्र समजू शकली नाही.
संसारात नुसते कर्तव्य करायचे नसते तर आपल्या जवळच्या व्यक्तींच्या भावना समजून घेणं माणसांच्या जगण्याला अर्थ देतं, हे शेवटी समजलं रमेशला..पण खूप काही घडून गेल्यावर!

©
डॉ. अंजली/अनन्या 
# आरसा
mindmatteraa@gmail.com

(फोटो :गुगल )


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा