संध्याकाळी पाच साडेपाचची वेळ. मुंबईहून नाशिकला येतांना जो टोलनाका आहे त्यावर गाड्यांची गर्दी होती.
या टोलनाक्यावर काही तृतीयपंथी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांपाशी थांबून पैसे मागत असतात. गाडीच्या काचा बंदच असतात बहुतेकांच्या. ज्यांच्या उघड्या असतात त्यांच्याकडे ही मंडळी थांबतात. त्या दिवशी टोलनाक्यावर गर्दी आणि हे पैसे मागणारे तृतीयपंथी. मी बघत होते..शेजारीच असणाऱ्या गाडीच्या मागच्या सीटवर एक सुंदर तरुण मुलगी एकटीच बसली होती..काहीतरी वाचत असावी. तिचं लक्ष बाहेर नव्हतं म्हणून इतर लोकं ज्यावेळी त्यांना बघून पटापट आपल्या गाडीच्या काचा बंद करत होते पण ती मात्र या सगळ्यापासून आपल्याच विश्वात गुंग होती..
एक हिरवी साडी नेसलेला तृतीयपंथी त्या गाडीच्या जवळ गेला..तिथेच एक गजरेवाला होता..त्याच्यापाशी थांबून त्याने टपोऱ्या मोगऱ्याच्या फुलांचा भरगच्च गजरा घेतला..खरंतर गजरा घ्यावा असे मलाही वाटले होते पण ‘त्याच्या’ समोर पूर्ण काच खाली करायला नको म्हणून जराशी काच खाली करून निदान फुलांचा वास तरी आपल्यापर्यंत पोहोचतोय का ते बघत होते.
गजरा घेऊन तो त्या मुलीच्या दिशेने वळला आणि तितक्यात त्या मुलीचे त्याच्याकडे लक्ष गेले..तिचं देखणं रूप आणि अचानक झालेली नजरानजर..
त्याने एकदम तिला विचारले..” हे अनारकली..., किधर चली..?”
एक सेकंदही वेळ न लावता ती मुलगी तितक्याच मिश्किलपणे पटकन त्याला म्हणाली..”डिस्को चली..!!!”
त्या दोघांच्याही चेहऱ्यावर एकदम हसू..अचानक आलेल्या या उत्तराने तो क्षणभर चपापला..त्याला अनपेक्षितच होते तिचे उत्तर..त्यालाच काय मलाही हसू आले ऐकून..खूप मनापासून..एकदम गंमत वाटली तिच्या या उत्तराची.
तो इतका इतका खुश झाला की त्याने सेकंदाचाही वेळ न लावता आपल्या हातातला मोगऱ्याच्या फुलांचा ओंजळभर गजरा तिला देण्यासाठी हात पुढे केला..
एक क्षणभर तिच्या चेहऱ्यावर तो घेऊ की नको असे भाव आले..पण क्षणभरच...
तिनेही तो गजरा दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला..तिची गाडी पुढे सरकली..
त्याने दुरूनच तिला म्हटले “ऐसेही खुश रहो बेटा..!” आणि तो दुसऱ्या गाडीकडे वळला..
माझ्या समोर नुकत्याच आणि अचानक घडलेल्या त्या घटनेचा अनुभव माझ्यासाठी इतका सुंदर होता की मी नखशिखांत थरथरून गेले!
एका हजरजबाबी उत्तरला इतकी दिलखुलास दाद मनापासून देणारा ‘तो’ आणि त्याला एक ‘माणूस’ म्हणून समजून घेणारी ‘ती’ मला त्या वेळेला जगातली अत्यंत सुंदर माणसं वाटली..
आपले किती गैरसमज आणि पूर्वग्रह असतात तृतीयपंथीय लोकांसाठी..पण माणसाची वृत्ती काही लिंगभेदावर अवलंबून नसते. मन सुंदर हवं..जे त्या हिरव्या साडीतल्या व्यक्तीचं होतं..नुसतं सुंदरच नाही तर दिलदार आणि रसिक सुद्धा!
आणि त्या सुंदर मुलीचे मनदेखील अत्यंत सुंदर आणि पूर्वग्रह विरहित स्वच्छ होते..
छोट्याशा क्षणात घडलेले ते माणुसकीचे आणि कलात्म रसिकतेचे मनोज्ञ दर्शनाने माझ्या मनातली जळमटं कायमसाठी स्वच्छ पुसली गेली आणि आजही माझ्यासाठी ती आठवण एक सगळ्यात सुंदर आठवण आहे!
डॉ. अंजली/ अनन्या
#कॅलिडोस्कोप
सुंदर
उत्तर द्याहटवा