गुरुवार, २३ मार्च, २०१७

राधा..


राधा..
तरल जाणिवेचा स्वर आहे राधा
जगण्यातल्या चैतन्याचं स्पंदन राधा!

कणाकणाने रसरसून उमलण्यातली उत्कटता आहे तिचं असणं.
आणि त्या प्रत्येक कणातलं सौंदर्य मनसोक्त उधळून देण्यातली तिची सहजता,

स्वतःमधल्या बेभान एकतानतेचं नाव आहे राधा!

पण नुसत ‘राधा!’ या मनाला झालेल्या जाणिवेत खरंच एकटी ‘राधा’ आहे?
नाही ना?
तिच्या एकटीचं नाव येतच नाही ओठावर आपल्या.

कारण एकटी ‘राधा’ अपूर्ण आहे!
आणि तरीही या अपूर्णतेमध्येच किती सौंदर्य आहे.
पूर्णतेकडे घेऊन जाणाऱ्या एका सहज सुंदर प्रवासाचा माग आहे!

त्या परिपूर्णतेत विलिन झाल्यानंतर देखील मागे उरलेली तिची स्वतःची परिपूर्ण वेगळी ओळख आहे!

‘मृण्मयी’...राधेचं दुसरं नाव!                      
याच मातीतली..याच जगातली..म्हणून आहे ती मृण्मय.
पण असं आहे खरंच?
नाही!

कारण ती तर जाणिवेने जगणाऱ्या प्रत्येक संवेदनशील स्त्री च्या मनात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तिला भेटते!

या अर्थाने ती चिन्मय आहे!
तिचं अस्तित्व,तिचं असणं सगळं इथल्या मातीत रुजलेलं..

याच मातीत, जमिनीवर रुणझुणती आहेत अजूनही तिची पावलं.

मातीच्या या पावलांना सदैव लागलेली ओढ मात्र आहे नीलवर्ण आकाशाची.
तिच्या रक्तातूनच वाहतोय प्रेमाचा आदिम प्रवाह अखंडपणे.

म्हणून स्वतःचा स्वीकार ती रूढ पारंपारिक बंधनापलिकडे जाऊन करू शकते वेळोवेळी.

दोन व्यक्तींमध्ये असलेल्या अवकाशाचं भान आहे उत्कटतेने एकमेकांवर असलेल्या प्रेमात. आणि याच अवकाशात त्यांना एकमेकांबद्दल वाटणारी अनिवार ओढ ही आहे.  

प्रेम भावनेचा कोणताही विभ्रम व्यर्ज नाही त्यांच्या या अलौकिक नात्यासाठी.

काळ आणि अवकाशाच्या परिघात घडणारे सगळे अविष्कार जणू त्यांच्या एकरूप होण्यासाठीच घडत असावेत युगानुयुगे.

तिची लोभस आकाशाचं निळेपण सामावून घेणारी स्वप्नं..
मेघरंगात रंगलेली. मातीच्या हिरव्या लवलव अन्कुरातून व्यक्त होणारी.

आपल्या अनंत डोळ्यांनी कान्हाच्या प्रत्यक्ष भेटीची आस ठेऊन असलेली,  युगानूयुगे त्याची वाट बघणारी राधा!

तिची आठवण म्हणून का आहे लवलवणारं एक स्वप्नाळू मोरपीस त्याच्याही डोक्यावर?
तिचं हे वाट बघणं कदाचित संपेल..न संपेल..

तिच्या अस्तित्वातच आहे कमालीचा सोशिक संयम.
संपूर्ण आपलेपणा आणि क्षणात सर्वस्व उधळून देण्याची मन:पूर्वकता..

तिच्या बंद ओठाआड असलेलं मौन चराचरातल्या थेंबा
थेंबातून बोलकं होतं..त्यावेळी राधा असते आपल्या प्रियतमाला भेटण्यासाठी असलेली अधीर,उत्सूक प्रियतमा.

खरंतर राधा आहे एक प्रतीक,
पृथ्वीचं..!! धरेचं..!

आणि कान्हा आहे असीम,अखंड घननीळ आकाश!
तिला संपूर्ण वेढून असलेलं!

या जमिनीवर असलेल्या सजीव आणि निर्जीव सृष्टीतल्या असंख्य साद प्रतिसादाचं विश्व म्हणूनच तिच्यात सामावलेलं आहे.

सृष्टीच्या अनेक अविष्कारांचं खरेपण आहे तिची जगण्याची प्रेरणा.
तिचा कान्हा तिचा सोबती आहे, सखा आहे, सहचर, सर्वस्व आहे.
त्याच्या असण्यात तिचे अस्तित्व पूर्ण होते.

तो आहे म्हणून ती आहे..
आणि ती आहे म्हणून तर तो देखील आहे.

तिचा घननीळ..मिलनाच्या ओढीनं सर्वांगानं तिला सामावून घेण्यासाठी आवेगाने झेपावलेला तिचा प्रियकर.
सरींवर सरी तो बरसत राहतो बेधूंद आणि ती चिंब भिजता भिजता
उमलून येते आतून असोशीने.

तो उतरतो अलगद नदीच्या झुळूझुळूणाऱ्या पाण्यात
त्यावेळी पावलाखालच्या मऊ मऊ गवताच्या पात्यावर अलगद उतरतात
त्याच्या बासरीचे सूर.

तिला शोधत वारा निघतो रानोमाळ त्या क्षणी देखील ती तिथेच असते.
त्याच्याकडे बघत, अनिमिष नजरेने, पापणीदेखील न लवता..
कणाकणाने त्याच्या अस्तित्वात समर्पित, कृष्णरंगात
एकरूप त्याची सखी! 

या मिलनाचे रंग आकाशभर उमटतात तेव्हा कान्हा आणि राधा वेगळे कुठे असतात?
राधाच्या मृण्मय पावलांनी कृष्णवर्ण आकाशात चांदण्यांची रांगोळी उमटते आणि कान्हाच्या सप्तसूरांनी राधेच्या कणाकणात सृजनाचे बीज रुजते!

राधेचं फुलणं..राधेचं वारेमाप सर्वस्व उधळून प्रेम करणं..

राधेचा प्रत्येक ऋतू त्याच्या परिचयाचा!

रूढ बंधनांचे पाश ओलांडून तिची मनस्वी ओढ त्याला पुन्हा पुन्हा खेचून आणते तिच्याकडे!

कल्पन्ताचे आणि युगानुयुगांचे अंतर पार करून! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा