गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५

रानाची लक्ष्मी

माझ्या आजोळी घराच्या मागच्या अंगणात आजोबांनी आवर्जून लावलेलं कलमी आंब्याचं झाड होतं.बेताच्याच उंचीचं. अतीव काळजीपूर्वक जोपासना केलेलं. त्याच्या वाढीवर परिणाम होऊ नये म्हणून त्याच्याजवळच्या केळीच्या आणि जास्वंदीच्या झाडाची मुळासकट दुसरीकडे रवानगी झालेली. आजोबा रोज सकाळी न चुकता त्याच्यापाशी जात. का कोणास ठाऊक पण त्यांचा फार जीव त्या झाडावर. त्याला सतत जैवीक खत आणि कसल्याशा औषधी फवारणीची देखभाल करण्याची माळ्याला सक्त ताकीद असे.
माळीकाका बागेला पाणी घालत असतांना त्यांच्या मागेमागे फिरण्यात आणि त्यांनी केलेल्या झाडांभोवतीच्या ळ्यांमधून पाण्याचा प्रवाह एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत पोहोचताना बघण्यात माझा कितीतरी वेळ निघून जात असे. पण आजोबांचं बागेत येणं म्हणजे फक्त त्यांच्या लाडक्या झाडाशी त्यांची भेट. त्याची इतकी काळजी घेऊनही ते मात्र सतत नव्या नव्या संकटांनी ग्रासलेलं! बेताच्याच उंचीपर्यंत ते वाढलं. दरवर्षी बेताच्याच मोहोराने बहरलं..त्याला कैऱ्याही काही फार भरगच्च लागत नसत. तरीही आजोबा अट्टाहासाने त्याची निगराणी करीत. त्या झाडाला जरा काही झालं की अस्वस्थ होत. चिडचिडे देखील होत. माळीकाकांवर उगीचच डाफरत. 

त्यांच्या या वागण्याचं मला फार नवल वाटे. असं काय आहे त्या आंब्याच्या झाडात की त्याच्या कौतुकापुढे आजोबांना इतर कुठलंही झाड दिसू नये? आजीला देखील त्यांचा हा स्वभाव माहीत होता. ती त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नसे. ते झाड म्हणजे त्यांच्या बाबांची, अप्पांची आठवण आहे, असं तिने एकदा कोणालातरी सांगितलेलं मी ऐकलं होतं. 

त्या आंब्याच्या झाडाच्या मागच्या बाजूला पण कंपाऊंडपलीकडे एक बाभूळचं झाड होतं. चांगलं जाडजूड आणि भक्कम खोड असलेलं ते झाड अस्ताव्यस्त फांद्यांनी विस्तारलेलं होतं. मला आठवतंय सुरवातीला अनेक वेळा आजोबांनी ते माळ्याकडून तोडून घेतलं होतं. एकदा तर त्यांनी त्याला  ते झाड मुळासहित तोडून टाकायला सांगितलं, त्याने तसं ते तोडलंही पण जाडसर खोडाचं लाकूड जमिनीला इतकं घट्ट धरून बसलेलं की त्याच्याचाने ते काही जमिनीतून निघेना, शेवटी त्याने प्रयत्न सोडून दिले. त्या दिशेने आलेला लख्ख उजेड आणि वाऱ्याने आजोबा खुश होऊन गेले होते.








मला मात्र फार वाईट वाटले. आजोबांना काही म्हणण्याची हिंमत नव्हती पण मला त्यांचा फार राग आलेला होता. कारण मला ते झाड फार आवडे. 

दर सकाळी आणि संध्याकाळी त्यावर चिमण्यांची शाळा भरे. त्यांच्या अखंड चिवचीवीने वातावरण भरून जाई. रोज असंख्य चिमण्या थव्याने झाडावर बसायला येत आणि उडतानाही थव्यानेच उडत. मागच्या अंगणातल्या ओट्यावर बसून त्यांची गम्मत बघणे मला खूप आवडे. त्या चिमण्यांशी, त्या झाडाशी माझं एक वेगळंच नातं होतं. तशी बागेतली सगळीच झाडे माझ्या आवडीची होती, अगदी आजोबांचा आंबाही. पण हे बाभळीचं झाड मला माझ्या एकटीचं आहे असे वाटे. आजोबांकडे गेलेल्या प्रत्येक सुट्टीत त्याचं आणि माझं नातं वाढत, घट्ट होत गेलेलं होतं. 

ते झाड तोडू नये म्हणून मी हट्ट धरून बसले, रडले देखील. पण माझ्या रडण्याकडे त्यावेळी कोणीही लक्ष दिले नव्हते.  माझ्या मनातला आजोबांबद्दलचा राग मात्र पुढे बरेच दिवस टिकला होता. 

त्यानंतर पुढच्या सुट्टीत आजोबांकडे गेलो आणि पाय धुण्यासाठी म्हणून मागच्या अंगणात गेले. बघते तर काय माझे बाभळीचे झाड पुन्हा माझ्या स्वागताला हजर! इतर कशानेही झाला नाही इतका आनंद मला त्या लहानखुऱ्या झाडाकडे बघून झाला.

आजी देखील खुद्कन हसली आणि म्हणाली, “अगं हे लाख तोडतील पण ती कसली चिवट..अर्ध्या तुटक्या खोडातून पुन्हा उभी राहिली. ना कोणीss तिला पाणी घातलंss, ना खत घातलंs..रानची लक्ष्मी ग ही! सगळ्या पाखरांची आई. अग यांच्या वडिलांनाही झाडांचा फार सोस. मग ह्यांना मी सांगितलं की तुमच्या आंब्याच्या झाडानेच जमिनीखालून पोषण पुरवलं असेल तिला,तुमच्या अप्पानीं सांगितलं म्हणून! हो, मी आपली पुढच्या अनेक वर्षांची तुझ्या झाडाच्या सुरक्षेची सोय केलीये बरका!” 

आजीला तर गळामिठी घातलीच मी. पण ह्यावेळी सगळ्यात आधी भेटले ते आंब्याच्या झाडाला! त्याच्या पुढ्यात उभं राहून बाभळीकडे बघितलं तर नेमक्या त्याच वेळी चिमण्यांचा थवा भुर्रकन झेपावला आभाळात आणि हिरवीगार बाभळ नखशिखांत थरथरली होती!

आपल्या धमन्यांमधून रक्ताबरोबरच वाहत असलेले हे असे कितीतरी प्रवाह आपली जीवनेच्छा बळकट करत असतात. आज जेव्हा मागे वळून बघते तेव्हा जाणवते आंब्याच्या झाडाने जमिनीखालून बाभळीच्या मुळांना आधार दिला असेल..नसेल..
पण जमिनीवर असलेल्या आणि आभाळाच्या दिशेने पुन्हा नव्याने झेपावलेल्या रानातल्या त्या लक्ष्मीचं हिरवंगार विजीगिषु रोपटं माझ्या मनाच्या अंगणात कायमचं रुजलं ते त्याक्षणी! 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा