रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

अखंड चालणारा प्रवास!

ईश्वर असतो निसर्गात! आपल्या जगण्यातल्या प्रत्येक क्षणात.
आपल्या आजूबाजूच्या कणाकणात. आपल्या माणसांच्या निर्हेतूक आपलेपणात.
हे ‘आपलं’ वाटणं असतं ना ते स्थळ, काळ आणि सीमेच्याही पलीकडे असतं.
अशा या खूप साऱ्या आपल्या वाटणाऱ्या माणसांनी माझं विश्व समृद्ध आहे!
असंच आज एक आनंदाचं देणं कबिराचं..!

साधंसुधं माणूसपण शोधणारं तत्वज्ञान शोधणारा कवी. काय आहे कबीराचं म्हणणं? जगण्याच्या प्रवाहात आपल्याला झालेल्या साक्षात्कारासह जगाला सामावून घेणं आहे हे काव्य म्हणजे. शब्दांचे बोट धरून आपण अलगद उतरतो  त्याच्या अनुभवांच्या प्रदेशात..मनाला उमगतो..त्याच्या जगण्यातून उलगडत गेलेला त्याचा काळ, त्याच्या जगण्याचा परिसर, त्यावेळेस असलेली माणसं, त्यांचं जगणं, आचार, विचार,जाणिवा,संघर्ष..इतिहासाच्या पानावर असलेलं ते जग थेट जागं होतं आपल्या मनाच्या कॅनव्हासवर!

ईश्वरप्राप्तीचा कबिराचा शोध.. त्या मार्गावरून जात असतांना साक्षीभावाने त्याने घेतलेले जीवन अनुभव, त्या अनुभवांकडे सजगपणे बघणारे, त्यांचा अर्थ लावणारे त्याचे सुजाण मन आणि त्या जगण्यातून शब्दबद्ध झालेलं त्याचं काव्य. स्वत:चं आयुष्य जगता जगता आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीची किती नेमकी जाणीव त्याला होती.सर्वसामान्य लोकांच्या मर्यादा, कुवत ओळखून त्यांच्याही आयुष्यात बदल घडून यावा यासाठी आपली कळकळ व्यक्त करणारा कबीर जे जे उत्कटपणे सांगावेसे वाटतेय ते ते सगळे स्पष्टपणे सांगत जातो. मनाला जे काही पटले, रुचले ते स्वीकारत आणि न पटलेले परखडपणे नाकारत. समाजातल्या सगळ्यांना सोबत घेऊन. निर्गुण ईश्वराचा शोध घेतांना आलेल्या जगण्यातल्या अनेक अनुभवांचे वेगळेपण त्याच्या काव्यात आहे.
खरंच, आपल्यालाही प्रत्यक्ष जगण्यातूनच तर उलगडत जातात ना आपल्याही आयुष्याचे अनेक अर्थ..कबीर वाचायचा यासाठी. इतिहास आणि वर्तमानाचा धागा जोडतांना जाणवते की सगळं काही बदललं तरी माणसांच्या जगण्या वागण्याच्या पद्धतींमध्ये एक अंतर्गत सुसंगती आहे. प्रत्येक अनुभव स्वत:च घेऊन बघावा लागतो असे नाही. दुसऱ्यांचा अनुभव आणि त्यांची जगण्याची शहाणी नजर समजून घेता आली तर त्यात वाईट काहीच नाही. अनुभव हे अनुभव असतात.परिस्थिती आणि दृष्टी वेगवेगळी असली तरी त्यामुळे त्या अनुभवाची प्रत कोणाला ठरवता येत नाही. त्या अनुभवांच्या प्रकाशात आपल्या दृष्टीचा परीघ वाढवायचा की नाही हे मात्र आपल्यालाच ठरवावे लागते.

दुसऱ्या कोणाचं जाऊदे, प्रत्यक्ष आपल्या स्वत:च्या जगण्याला तरी भिडतो का आपण सच्चेपणाने?
आपल्या समोर आलेली परिस्थिती आहे तशी स्वीकारून आपण आपलं जगणं आपल्यासाहित सगळ्यांसाठी सोपं करू शकतो. मला वाटतं,जगता जगता आपलं आणि इतरांचं आयुष्य सुंदर बनवणं म्हणजेच तर ना अध्यात्म?

ईश्वराचा शोध! हा प्रत्येकाचा वेगळा आणि स्वत:साठीचा असतो. प्रत्यक्षात आपण काय करतो? तर इतर कोणाच्यातरी निष्कर्षावर आधारलेल्या खुळचट कल्पना कुठलीही चीकित्सा न करता मनाशी घट्ट धरून ठेवतो. ‘संसार’ ही ईश्वर शोधातल्या रस्त्यावरची सगळ्यात मोठी अडचण,असे कोणीतरी सांगितलेले अंतीम सत्य आहे असे मानून चालतो.
‘संसार’,‘माया’,’मोह’,’मोक्ष’ या शब्दाचेही असेच काहीसे ओझे आपल्यापैकी अनेकांच्या मनावर असते. असे काही शब्द ऐकून मनावर आलेले दडपण ना पेलवते,ना फेकून देता येते.
आपल्याला जगणे आवडते..आनंदी राहायचे असते. रोजचा उगवणारा दिवस अनेक आनंद,चिंता,काळज्या,व्यथा वेदना,लोभ,मोह,मत्सर,स्पर्धा सगळा तोचतोचपणा घेऊन येतच असतो की आपल्या पुढे..तो काही ‘माया’ म्हणून उगवायचा थांबत नाही. आणि ही सारी ‘माया’ आहे असे कितीही समजले तरी आपल्याला आतून आनंदी राहायचे असते..सुखी व्हायचे असते..सुखी होण्यासाठी या कशातही न अडकता जगता यायला हवे असेही सांगितले जाते..
असे निर्लेप होऊन जगायचे? खरंच असे ता येते? मनाला तर किती आणि काय काय हवे असते! सकारात्मक आणि नकारात्मक भावनांच्या विविध छटा आणि रंग सर्वसामान्य माणसांच्या जगण्याला व्यापून असतात. त्यानुसार लोक अभिव्यक्त होत असतात. खरेतर हा अगदी रोजच्याच जगण्याचा भाग असतो पण सो कॉल्ड लोक यालाही मायाच म्हणतात. पण ही जी काही माया आहे तिच्यामुळे आमचं जगणं सुंदर आहे ना! ती आवडतेय ना आम्हाला! प्रत्यक्ष जगतांना एखादी भावना अनुभवणे हेच मुळी जिवंत असल्याचे लक्षण नाही का?

पण मला वाटतं आपली चूक एखादी गोष्ट नीट समजून न घेतल्यामुळे होते. ‘अधात्म’ सुद्धा आपण चुकीच्या पद्धतीने समजून घेतो. परिणाम असा होतो की येणारे क्षण तर थांबवता येत नाहीत आणि मन मात्र अपराधीपणाच्या ओझ्याखाली दबून जाते. महाभारतातल्या, रामायणातल्या गोष्टींवरून काय समजते? कारण ते महाकाव्य म्हणजे इतिहासातील माणसांची आणि घटनांची मौखिक परंपरेतून आलेली बीजे आपल्या कल्पनाशक्तीने फुलवणारी कवी कल्पनाच होती. प्रत्येक गोष्टीतून,माणसांच्या जगण्यातून व्यक्त होणारे जगण्यातले विविध भाव आणि त्यांना स्पर्श करणारे वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तींच्या लोकांचे जीवन. रामायण,महाभारतातली वेगवेगळी पात्रं आपल्या आजूबाजूला आजही वावरतांना दिसतात! रामाची गोष्ट आपल्याला आवडते पण तरीही कृष्ण आपल्याला जास्त जवळचा वाटतो कारण पाप आणि पुण्य या नैतिक कल्पनांच्या समाजमान्य चौकटी पलीकडे जाऊन पोहोचणारे त्याचे चरित्र!  

अध्यात्म म्हणजे आयुष्याकडे,जगण्याकडे पाठ फिरवणं नाही तर जगण्यातल्या प्रत्येक अनुभवला निर्लेप मनानं सामोरं जाणं, म्हणजे कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय तो स्वीकारणं मग तो अनुभव कोणा व्यक्तीबद्दलचा असो की परिस्थितीबद्दलचा. सजग राहून आपल्याला फक्त वर्तमानातला तो क्षण, तो अनुभव घेता यायला पाहिजे. तो घ्यावा कसा? यासाठी लोकांना रस्ता विचारणं यात काही चूक नाही पण केवळ परंपरेने घालून दिलेले आहेत म्हणून असे संकेत कोणताही प्रश्न मनात निर्माण न होता मान्य करणे हे स्वत:वरच अन्याय करण्यासारखं नाही का?
डोळसपणे आयुष्याकडे बघणे आणि मनातल्या प्रश्नांचा पाठपुरावा करतांना नको असलेल्या गोष्टींचं ओझं फेकून देण्याची हिंमत स्वत:मध्ये येणे हेच तर आपल्या ध्येयापर्यंत जाता जाता खरं शिकणं! चुकत,पडत,धडपडत, स्वत:ला जखमी करून घेत शिकण्यातून जे शहाणपण मिळतं ते माणसाला खऱ्या अर्थाने जगण्याचं समाधान देतं. आपल्या मनातल्या रूढ समजुतींना थेट तपासून घेण्याचं शहाणपण. आपल्या प्रश्नांची आपली आपण उत्तरं शोधण्याचं बळ या शिकण्यातून मिळते. आज आपल्या आजुबाजूचं जग इतकं मायावीपणे बदलत असतांना, माणसांच्या मनाचा,विचारांचा थांग शोधतांना आपल्यालाही थोडा चौकटी बाहेरचा विचार करता यायला हवाय. स्वत:बरोबरच इतरांचा देखील निर्लेपपणे विचार करता यायला हवाय. आपण फक्त स्वत:च्या जगण्याचा विचार करतो,आनंदाचे मार्ग केवळ स्वत:कडे वळवून घेतो. आपलं चुकतं ते इथेच! कारण आनंदाचा उगम आपल्या आत असतो तो अनेक अंगाने वाटांने विस्तारत खूप दूरवर जाऊन पोहोचला तर तो आनंद कितीतरी पटीत वाढतो. त्याला अनेक वाटा,उपवाटा फुटायला हव्यात. असे सहजतेने देता घेता येणारे आनंदाचे क्षण म्हणजे खरे अध्यात्म.

कबीराचे दोहे वाचता वाचता मनात असे असंख्य विचार आले.

वाचल्यानंतर काही आपल्याला समजतं,आवडतं, पटतं..आणि काही गोष्टी कधी कधी पहिल्यांदा वाचतांना समजतदेखील नाहीत.विचार सुरु होतात मात्र. कबीर जेव्हा वागण्यात, जगण्यात उतरेल तेव्हा पुन्हा नव्याने भेटेल कदाचित. अखंड चालणारा प्रवास आहे हा...! 

गुरुवार, ३० जुलै, २०१५

कबीर समजून घेताना...

कबीर, हिंदी संत साहित्यातील फार मोठे नाव.

साधी सरळ शब्दरचना. पटकन अर्थ समजेल,मनाला पटेल आणि थेट हृदयाला जाऊन भिडेल असे ओघवते शब्द..बोलीभाषेतले..लोकभाषेतले. 
संत कबिरांची कविता मध्ययुगीन हिंदी कवितेचा एक महान अविष्कार आहे.त्याकाळात आणि आजही जात, धर्म, प्रदेश, वर्ग या सीमारेषा सहज ओलांडून त्यांचे  शब्द भारतभर जाऊन पोहोचलेले आहेत आणि लोकांनी आपलेसे मानले आहेत. आजही त्यांच्या रचना आणि त्याद्वारे त्यांनी सांगितलेले विचार कालबाह्य झालेले 
नाहीत.

कबीराचा काळ आहे साधारणपणे विक्रम संवत १४५५ ते १५७५. भारतीय कवितेच्या इतिहासाच्या दृष्टीकोनातून मध्ययुगीन कालखंड. त्याआधीची कविता ही प्राचीन भारतीय कविता. ही उत्तर भारतातून आलेली कविता होती असे इतिहास सांगतो. मध्ययुगात मात्र भारतभर या कवितेची पाळेमुळे पसरलेली दिसून येतात. मध्ययुगीन भारतीय कविता हा प्राचीन भारतीय कवितेनंतरचा कवितेचा फार मोठा कालखंड. प्राचीन कवितेने भारतीय तत्वज्ञान सांगितले तर मध्ययुगीन भारतीय कविता ही संत कवींची भक्ती कविता होती. तिने तत्वज्ञानाचा अर्थ लोकांना लोकांच्या भाषेत समजावून सांगितला. 
भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमधून अनेक संतकवींनी काव्यनिर्मिती केली. हे कवी संत बहुजन समाजातून आले आणि त्यांनी बहुजन समाजाचे नेतृत्व करत आजवर पोथ्या पुराणात बंदिस्त असलेले ज्ञान लोकभाषेतून सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातल्या उदाहरणातून कवितेतून मांडले. या रचना घराघरात जाऊन पोहोचल्या आणि देशभर एक व्यापक भक्ती चळवळच उभी राहिली. लोकभाषेतून व्यक्त होणारी ही लोककविता सर्वसामान्य माणसाला आपलीशी वाटली. लोकांशी संवाद साधून लोकांमध्ये फिरणारे आणि लोकांना सहजसाध्या सोप्या शब्दात ईश्वराचे रहस्य उलगडून सांगणारे हे संत लोकांना आपल्यातीलच एक वाटले. 
पोथ्यांमधून बंदिस्त असलेले आणि ठराविक वर्गाच्या मालकीचे ज्ञान तोपर्यंत सर्वसामान्यांपासून दूरच होते आणि निरर्थक कर्मकांडात समाज अडकून पडलेला होता. संतकवींनी धर्माचे हे जोखड बाजूला सारून धर्माचा नवा अर्थ समाजाला उलगडून दाखवला. आपले वागणे आणि आपले विचार यातून त्यांनी शुद्ध नैतिकतेचा आदर्श समाजापुढे उभा केला. त्यांच्यातील या पारदर्शक वृत्तीमुळेच त्यांची कविता आणि त्यातून त्यांनी केलेला उपदेश लोकांनी आपलासा केला. सत्य, अहिंसा आणि शांती याबरोबरच समतेचा आणि बंधुभावाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत मध्ययुगीन संतकवितेने भक्तीचळवळीचे व्यापक रूप घेतले. 

भारताच्या कानाकोपऱ्यात खोलवर रुजलेल्या आणि वाढलेल्या या कवितेचा एक समृद्ध वारसाच आपल्याला लाभलेला आहे. संत कवी बसवेश्वर, त्यांच्या समकालीन अक्कमहादेवी, सोळाव्या शतकातील पुरंदरदास,कनकदास, सिद्धेश्वर,संतकवी रामानंद, तुलसीदास,रोहिदास, कबीर, मीराबाई, सूरदास,ज्ञानेश्वर,तुकाराम,नामदेव,रामदास,जनाबाई यासारख्या अनेक संत कवींच्या रचनांनी पंजाबपासून केरळपर्यंत आणि राजस्थान पासून बंगालपर्यंत विविध प्रदेशांचे संस्कार होत विविध भाषांचे शब्द सामावून घेत भारतीय कविता विस्तारत गेली. हिंदी संतकविता,कन्नड संतकविता, सूफी संतकविता, मराठी संतकविता..अशा अनेक अंगांनी समृद्ध होत गेली.

अनोखा अंदाज,पारदर्शक ढंग आणि परखड अविष्कार त्यामुळे कबीराच्या कवितांचे योगदान संत कवितांमध्ये अनन्यसाधारण आहे. कबिरांच्या कविता हे केवळ त्यांचे काव्य नाही तर त्यांचा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास आहे. ईश्वर ही अनुभूतीची गोष्ट आहे. तो कोणत्याही पोथ्या-पुराणात बांधलेला नाही यावर त्यांचा विश्वास होता. ठराविक वर्गाची मक्तेदारी बनलेले कप्पेबंद आध्यात्मिक तत्वज्ञान माणसामाणसांत अनेक दृश्य-अदृश्य भिंती निर्माण करते हे त्यांनी बघितले.  
कबीराच्या जन्माविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात पण कबीर नीरु अली आणि नीमा या मुसलमान विणकर,जुलाहा जमातीच्या जोडप्याने लहानाचा मोठा केलेला मुलगा. आपल्या गुरुकडून त्यांना हिंदू धर्माची ओळख झाली. त्यांच्या कवितेवर हिंदू प्राचीन तत्व कवितेचा आणि इस्लामी परंपरेतील सूफी कवितेचा प्रभाव जाणवतो. त्या काळातील समाज हिंदू धर्मातील कर्मकांड, परंपरा, जातपात,चालीरिती, उच्च-नीचता आणि मुस्लीम शासनकर्त्यांची धार्मिक सक्ती यामध्ये त्रासला गेला होता. तोपर्यंत भारतातील जातीव्यवस्था अपरिवर्तनीय आहे अशा विश्वासावर संपूर्ण समाजव्यवस्था आधारलेली होती. अचानक झालेल्या मुस्लीम आक्रमणाने समाजात अराजक निर्माण झाले. हे ताण-तणाव ओळखून त्यातून सर्व जनतेला बाहेर काढणे आवश्यक होते. 

त्या काळातील संतांच्या रचनांमधून समाज प्रबोधन याहेतूने झालेले दिसून येते. कबिरांच्य कवितेतही हे विशेष ठळकपणे व्यक्त झालेले दिसतात. कबीराच्या स्वभावातला उत्कटपणा आणि जिज्ञासू वृत्ती यातून त्यांचा आध्यात्मिक प्रवास समृद्ध होत गेला. त्यांच्या स्वभावात एक प्रकारचे झोकून देणे आहे. ती तीव्रता आणि उत्कटता हा त्यांच्या काव्याचाही ठळक विशेष आहे.अध्यात्माच्या शोधात त्यांनी खूप भटकंती केली. या दरम्यान अनेक मतांचा आणि सिद्धांतांचा त्यांनी  अभ्यास केला. कबीर रुढ अर्थाने शिक्षित नव्हते पण त्यांचे शब्द म्हणजे त्यांच्या प्रवासातील रोकठोक अनुभव आहेत.
‘मसि कागद छुयो नहीं,कलम गही नहीं हाथ
चारिउ जग की महातम,मुखही जनाई बात’
असा कबीर म्हणूनच लोकांना आपल्यातीलच एक वाटतो. व्यवसायानेही सामान्य विणकर. आपल्या झीनी-झीनी बीनी चदरिया..या रचनेत आपल्या कामातून अवघड तत्वज्ञान ते लोकांना सहजपणे सांगतात. हठयोगातील मर्म कबीरांनी लोकांच्या शब्दात बांधलय..

झीनी-झीनी बीनी चदरिया
काहे कै ताना, काहै कै भरनी, कौन तार से बीनी चदरिया।
इंगला पिंगला ताना भरनी, सुखमन तार से बीनी चदरिया॥
आठ कँवल दल चरखा डोलै, पाँच तत्त गुन तीनी चदरिया।
साँई को सियत मास दस लागै, ठोक-ठोक कै बीनी चदरिया॥
सो चादर सुर नर मुनि ओढ़ी, ओढ़ी कै मैली कीनी चदरिया।
दास कबीरजतन से ओढ़ी, ज्यों की त्यों धरि दीनी चदरिया॥

कबीर म्हणतात,

माहित नाही परमेश्वराने असा कोणता धागा आणि कोणती वीण वापरून हे शरीररूपी वस्त्र विणले आहे..सुषुम्नेने नियंत्रण करणाऱ्या तारेने इडा-पिंगला या संवर्धक आणि संरक्षक धाग्यांचे ताण आपल्या शरीरभर पेलले आहेत. पृथ्वी,जल,वायू,उर्जा आणि आकाश ही निसर्गातील पाच तत्त्वे मिळून आणि सत्व, राज आणि तम या तीन गुणांनी युक्त आपल्या शरीरातील अष्टकमळदलांचा चरखा लीलया सांभाळला आहे. दहा महिन्याच्या आत ईश्वर ही चादर संपूर्णपणे काळजीपूर्वक बनवतो...आणि आपल्या सुपूर्द करतो आणि आपण ती किती निष्काळजीपणे मळवून टाकतो!

कबीरांनी हे भजन स्वत: गायले...गावोगाव फिरून सांगितले आणि समोर जमलेल्या निरक्षर सामान्य लोकांना कबीर खरोखरच  आपल्यातलाच एक वाटला.

‘पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय’ या त्यांच्या सांगण्यामुळे लोकांच्या मनावरचे पारंपारिकतेचे दडपण काहीसे दूर झाले.

भजो रे भैया राम गोविंद हरी।
राम गोविंद हरी भजो रे भैया राम गोविंद हरी॥
जप तप साधन नहिं कछु लागत खरचत नहिं गठरी॥
संतत संपत सुख के कारन जासे भूल परी॥
भजो रे भैया राम गोविंद हरी।

कबीराने सांगितलेल्या गोष्टी स्वत: अनुभवलेल्या होत्या. त्यामुळे त्यातील सत्यता लोकांच्या मनाला भिडली. (भाग १)
-अनन्या.

सोमवार, १ जून, २०१५

‘वेळ धावतोय...पाहिलंत?’

“आपण असतो..कधी गर्दीत,कधी एकटे स्वत:पाशीच.
कधी नेहमीच्या परिचित वातावरणात तर कधी अपरिचित अनोळखी.
पण वातावरणातला अनोळखीपणा नजर टिपून घेत असतांना,
मन सतत सोबत असते आपल्या,आपल्याशी बोलत.
अचानक असं काही जाणवतं बघतांना की त्याच्याशी आपल्या मनाची नाळ जुळते.
वातावरणातला अनोळखी ताण सैलावतो.
आज अशीच अनोळखी शहरातल्या अनोळखी गर्दीत काही क्षण मी एकटीच,स्वत:शीच.
डोळे दिपून जावेत अशा आकर्षक वस्तूंचा बाजार भोवताली.
मी काही घेण्यासाठी नाही तर केवळ वेळ घालवण्यासाठी निरुद्देश,सावकाश एकेक वस्तू न्याहाळत.
आपल्या घरासाठी कोण बरं या वस्तू निवडत असेल?
ते घरही असंच असावं..सुंदर, पारदर्शक..काचेसारखं नितळ..यासारख्या वस्तूंनी सजलेलं, जराही डाग,धूळ विस्कटलेपण न चालणारं.. आठवणींचा खजिना प्रेमानं मिरवायला अशा घरात जागा शोधावी लागेल.
आपल्यासारख्या रंगीबेरंगी चित्रविचित्र रेषांची श्रीमंती मिरवणाऱ्या भिंती, आपली जागा सोडून भलतीकडेच अस्ताव्यस्तपणे विसावलेल्या वस्तू सांभाळणाऱ्या घरात या दुकानातल्या वस्तू दिसतीलही चांगल्या पण मनाचा धागा कुठल्याच वस्तूशी जुळेना!
सगळंच परकं..अस्पर्शित..

अचानकच भिंतींवरच्या अनेक घड्याळ्यांपैकी एकाकडे लक्ष गेलं.
त्याचं साधेपण आणि वेगळेपणही क्षणात भावलं.
मनातल्या एका आठवणीशी त्याचा धागा जुळला...
‘वेळ धावतोय...पाहिलंत?’...कधीतरी कुठेतरी वाचलेलं हे वाक्य.घड्याळ बघताक्षणी आठवलं.
शांत पाण्यावर दगड भिरकावल्यावर किती तरंग उमटावेत तितके तरंग मनभर उमटले होते या एका वाक्याने.
या घड्याळ्याकडे बघून मनात पुन्हा ती तरंगांची नक्षी उमटली. अवचित. अलगद.
आजूबाजूचं अनोळखी विश्व,परकेपण विसरून मी त्या घड्याळाकडे अनिमिषपणे बघत उभी.
मनातल्या ओळींचा आवेग अनुभवत..
एकबार वक्तसे लम्हा गिरा कहीं
वहां दास्ताँ मिली..लमहा कहीं नहीं..
वेळेच्या पावलांपाशी उभी असलेली एकेक हळूवार आठवण.
झाडाच्या पानाइतक्याच अलिप्तपणे,सावकाश अपरिहार्यपणे खाली ओघळलेला वेळ!
पाँव सूखें पत्तोंपे
अदब से रखना
क्यूं कि     
धूप में माँगी थी
तुमने इनसे पनाह कभी!!
अशी त्या वेळेशी आपलीही एक बांधिलकी...
काळ असाच धावणार पुढे..
क्षणांच्या पावलांशी रुजणार भविष्याचे स्वप्न.
उमलणार..पालवणार..फुलणार..कोमेजणार आणि सहजपणे तळाशी विसावणार.
एक एक आठवण आपल्याशी लपेटून घेत ‘वेळ धावतोय...पाहिलंत?’
चकचकीत वस्तूंच्या त्या बाजारात माझं लक्ष वेधून घेणारं ते एक चिमुकलं साधं घड्याळ,
मला मनापासून आवडलं!
अनोळखी गर्दीतही ओळखीच्या जीवलग छटा अशा खुणावतात कधी कधी!”





मंगळवार, १४ एप्रिल, २०१५

ताडोबा: मनात रुजलेले जंगल!

चंद्रपूरहून ताडोबाकडे जातांना शहरी लोकवस्तीच्या खुणा मागे पडत गेल्या.जंगलाच्या मोठ्या दरवाज्यातून आत जातांना मन उगीचच सावध, सतर्क झालं! छोट्याशा गावातून, लाल मातीच्या रस्त्यावरून गाडीने आम्हाला आम्ही राहणार होतो त्या ठिकाणापाशी सोडलं. जंगल सफारीसाठी आम्हाला घेऊन जाणाऱ्या जिप्सी येण्याआधीच आम्ही सगळे आवरून तयार होतो. एका गाडीत सहाजण अशा आमच्या पाच गाड्या ताडोबा बफर झोनमध्ये शिरल्या. दुपारचे ऊन चटका देणारे आणि आम्ही जय्यत तयारीत गाडीत बसलेलो. डोळ्यासमोर उलगडत जाणारा रानातला रस्ता. आजूबाजूचा वेध घेणारी शोधक नजर. इतक्या उन्हामध्ये जवळच असलेल्या पाण्याच्या एका छोट्या स्त्रोताकडे ड्रायव्हर गाडी घेऊन निघालेला. सोबत लोकल गाईड. आमच्या गाडीत वन्य जीव अभ्यासक प्रमोददादा. तिथे जाऊन पोहोचतो तर काय आमच्या आधीच दोन-तीन गाड्या तिथे हजर. न बोलता त्यांनी केवळ हाताने खुण केली. त्या दिशेने नजर टाकली तर काहीच दिसेना. मनात कमालीची उत्सुकता. त्याच वेळी लालसर पिवळ्या गवताच्या मागे काही हालचाल जाणवली. आणि काही कळायच्या आत वाघोबाच्या तोंडाचा आकार गवतावर उमटला. क्षणभर हृदयातला ठोकाही थांबल्यासारखा झाला. घेतलेला श्वासही ऐकू येईना इतकी नजर एकवटली. तो होता वाघडोह, ताडोबातला सगळ्यात मोठा वाघ. दहा पंधरा फुटांवर. आजूबाजूला इतक्या जवळ असलेल्या गाड्या आणि फोटो काढण्याचे आवाज याचे काहीही सोयरसुतक नसल्यासारखी बेफिकिरी त्याच्या चेहऱ्यावर. गवतापाठीमागून तो आला आणि दमदार धीमी पावलं टाकत आमच्या समोरून पाण्यात उतरला. आता तो संपूर्ण दिसला. केवढा होता तो! त्याने जर मनात आणलं असतं तर क्षणात आमचं होत्याचं नव्हतं करण्याचं सामर्थ्य त्याच्यात होतं पण आत्ता कडक उन्हाने त्याच्या जीवाची घालमेल होत असावी. त्यानंतर तो पाण्यात बसून होता आणि आम्ही तळपत्या उन्हाची पर्वा न करता त्याच्याकडे बघत होतो. तसा तो बेपर्वा. आपल्यातच मग्न. अंगावर बसणाऱ्या माशांचा त्याला त्रास होत असावा. अधून मधून त्याची थंड हिरवी नजर आमच्याकडेही वळत होती. आता गाड्याही वाढल्या आणि आवाजही. तरीही तो शांत..असा तासभर तरी निघून गेला आणि अचानक वातावरणात बदल झाला. ढग गडगडायला लागले. बघता बघता पावसाचे टपोरे थेंब अंगावर पडायला लागले. त्याच्यावरची नजर हटवावी असे वाटत नव्हते. त्या पावसातही तो तसाच बसलेला. विजा चमकत होत्या. पावसाच्या थेंबांचे फटकारे वाढले तसे तिथून निघणे भाग पडले. डोळे भरून वाघडोहकडे बघून आम्ही निघालो. निघावेसे मुळीच वाटत नव्हते तरीही. समोरून पावसाचे थेंब जोरात लागत होते. विजांच्या कडकडाटात जंगलातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडणेच योग्य म्हणून आमची गाडी वेगात निघाली. बफर झोन च्या बाहेर आलो आणि पाऊस जवळजवळ थांबलाच. स्वच्छ गार हवा. आभाळ काळ्या निळ्या रंगात डूबलेले. लाल लाल पाऊलवाटा जंगलभर विखुरलेल्या. डोळ्यासमोरचा गाडी रस्ताही लांबवर काळा कुळकुळीत..अंघोळ केल्यासारखा! 
रस्त्यात काही पक्षी दिसत होते पण प्राणी एकही दिसला नाही. जणू हा दिवस फक्त वाघोबांसाठीचा राखीव होता! परतल्यावर प्रत्येकजण हेच बोलत होता. आमच्या सोबत अतुलदादा (अतुल धामणकर),प्रमोददादाही राहणार होते. स्लाईडशोची तयारी होत आली आणि पुन्हा जोरदार वारावादळ, पाऊस. रात्री डोळे मिटतांना कानावर दूरवरून येणारे जंगलातले आवाज लाईट आल्यावर कुलरच्या आवाजात गुडूप झाले आणि मिटल्या पापण्यांआड वाघाचे राजबिंडे रूप पुन्हा जागे झाले.





दुसऱ्या दिवशी पहाटे पाचलाच तयार होऊन गाडीत बसलो. आज आमची गाडी पुन्हा बफर झोन कडेच वळली. हवेत पावसाळी पहाटेचा सुखद ओला गारवा. रात्रीचा अंधार पांघरून आपल्यातच मिटून गेलेले जंगल विविध पक्ष्या प्राण्यांच्या आवाजाने नुकतेच कुठे जागे होत होते. पहाटेच्या त्या वातावरणात मन अलिप्त होत गेले आणि शरीराच्या प्रत्येक संवेदनेला डोळ्यांचे संवेदन मिळाले. किती डोळ्यांनी बघावे? निसर्ग आपल्या देखण्या रुपात साक्षात सामोरा. अशावेळी हातात काय उरते? सर्वांगाने त्याचाच एक भाग होणे! नि:शब्द शांतता. वातावरणात आणि मनातही तिचे झिरपणे. कालच्या पावसाचा ओलसर वास..जंगलाचा रंग तपकिरी करडा लालसर. काही झाडे पोपटी कोवळ्या पालवीने बहरलेली. जंगलातून वाट काढणारी लाल लाल मातीची अग्निरेखा. बाजूला गळून पडलेल्या मोठमोठ्या साग पानांचा थर..जमीन कुठे दिसतच नव्हती. आजही आमच्यासोबत प्रमोददादा. जंगलाबद्दल वाटणारी आत्मीयता त्याच्या प्रत्येक शब्दात.
उष्ण कटिबंधीय पानगळ प्रकारात मोडणाऱ्या ताडोबा जंगलाचे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य असे दोन भाग पडतात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील हा सगळ्यात मोठा प्रकल्प. घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांचा तारू किंवा ताडोबा नावाचा देव. त्यावरून या जंगलाचे नाव ताडोबा पडले. याचा सुमारे ८५% भाग हा अतिसुरक्षित आहे. साग,बांबूची आणि मोहाची झाडे नजर जाईल तिकडे सगळीकडे दिसत होती. मोहाच्या फुलांचा गोडसर वास आसमंतात. पक्षांचे जग जागे झालेले. त्यांचे वेगवेगळे आवाज आणि रंग. आज सगळ्यात आधी दिसला तो रानकोंबडा..आपल्या कोंबड्यापेक्षा कितीतरी मोठा. त्याचा रंग तोच पण आवाज खूप वेगळा. रंग, गंध आणि नादाचे जग आजूबाजूला जागे होत होते. अधूनमधून कैऱ्यांनी भरगच्च लगडलेले आंब्याचे झाड दिसत होते. धावडा,ऐन,काटेसावर,हिरडा ही झाडे तर होतीच शिवाय पळसाच्या लाल नारंगी फुलांनी आणि अमलताशच्या पिवळ्याधमक फुलांनी जंगल खुलून दिसत होते. एका झाडावर बसलेला मोर आणि त्याचा भला मोठा पिसारा दुरूनच दिसला. जवळ गाडी जाते तोच त्याने हवेत मारलेला झोकदार सूर आणि त्याचे इतक्या उंचावरून सहजतेने उडणे आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदाच बघितले. अनेक मोर दिसले आणि लांडोरीही. एक मोर तर आपला संपूर्ण पिसारा फुलवून उभा असलेला दिसला पण आमची चाहूल लागताच त्याने इतक्या पटकन पिसारा मिटून घेतला की एका क्षणभरातच ते सौंदर्य नजरेआड झाले. जंगलातून फिरतांना संपूर्ण जंगल आपल्याशी बोलत असते. इथे प्रत्येक क्षणाचा अनुभव फक्त आणि फक्त एकदाच घेता येतो. जंगलातले चैतन्य हा सर्वांगाने घेण्याचा अनुभव आहे. म्हणून सतत सावध असणे आणि सावधपणे त्या समोरच्या क्षणाचे साक्षी होणे ते ही अतिशय अलिप्तपणे, हे पण खरंच जंगलाकडूनच शिकायला मिळते.
जंगलात आणखी आत शिरतांना बाजूने वेढलेली घनदाट झाडी आणि उलगडत जाणारा गाडी रस्ता. सारे काही थेट मनाला आत येऊन भिडते. कालच्या वादळी पावसाच्या खूणा जागोजागी. झाडाच्या फांद्या तुटून पडलेल्या तर काही ठिकाणी संपूर्ण झाडेही. गाडीला रस्ता बदलावा लागत होता, नवीन तयार करावा लागत होता तर काही ठिकाणी गाईड आणि ड्रायवर मिळून फांद्या बाजूला करून मार्ग मोकळा करत होते. विविध पक्षी दिसत होते आणि त्यांची माहिती लगेच समजत होती. पाण्याच्या तलावाजवळ जाऊन पोहोचलो तर कितीतरी पाणपक्षी रंग,रूप आकाराचे.
उघड्या चोचीचा करकोचा बघून तर निसर्गातल्या जैवसाखळीची कमाल वाटली. निसर्गाने प्रत्येकालाच काही न काही दिलेलं आहे. आपल्याला मिळालेल्या वैशिष्ट्याचा वापर जगण्यासाठी करून घेण्याची बुद्धीही. तसं तर निसर्गाने आपल्यालाही ते वैशिष्ट्य दिलंय. पण आपणच ते हरवलंय. कारण आपण सोडून बाकी सर्व सजीव अजूनही निसर्गाशीच प्रामाणिक आहेत म्हणून ते निसर्गाच्या जवळ आहेत आणि आपल्याला आज गाडीतून निसर्ग बघावा लागतोय.
बाजूच्या झाडीतल्या गवतात आकार उमटल्याचा भास तर सारखा होत होता. कधी त्यातून एखादा नर सांबर सामोरे येई तर कधी चितळ,चौशिंगा आपला कळप सांभाळत. कान टवकारून आमच्याकडे बघून पुन्हा जंगलात पसार.लंगूर माकडे तर जागोजागी. आम्हाला तर मादी लंगुरांचा ग्रूपच भेटला पोटाशी आणि आजूबाजूला बागडणाऱ्या पिल्लांसाहित. काळ्या तुकतुकीत चेहऱ्यावर कुतूहल संभ्रम आणि पोटाशी चिकटलेले पिल्लू तर चक्क हसत असलेले!





त्या दिवशीची दुपार अशीच उलघाल उन्हाची. आता आमची गाडी निघाली ताडोबाच्या कोअर जंगलात. लांबलचक रस्ते आणि दुतर्फा बांबूची अनेक झाडे,एकमेकात गुंतलेली. जंगलाच्या अस्तित्वाचे अनेक रंग आणि अनेक छटा. बाजूच्या कुरणात रानगवे दिसले चरतांना..आपल्याच मस्तीत. अवाढव्य आकार आणि बेदरकार नजर. मनात आणलं तर क्षणात परिसर उलटापालटा करण्याची ताकद अंगात. पण कोणताही प्राणी अगदी वाघसुद्धा आपल्याच नादात, विश्वात मग्न असतो. आपल्या गरजेपलीकडे दुसऱ्या कोणात त्यांची कधीही लुडबुड नसते. 
उन्ह सावलीची जाळी अंगावर झेलत आम्ही जंगलातल्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेत होतो. सांबर, चितळ, नीलगाय अधून मधून दिसतच होते. एका पाणवठ्याजवळ सकाळी एका गटाने वाघ बघितला होता. तो आत्ताही तिथेच असल्याचे संकेत इतर प्राण्यांच्या कॉल्सवरून मिळतही होते.
खरंतर हे सगळं जंगलातलं एक नाट्यच आहे. नुसत्या आवाजानेही जंगल आतून किती सतर्क आहे याची जाणीव करून देणारं. आपणच या सगळ्यात उपरे,त्रयस्थ. असे असले तरी जंगल आणि हे सगळे प्राणी अबाधित राहिले तरच माणूस टिकून राहील हे ही तितकेच सत्य आहे.
त्या दिवशी पुन्हा वाघ दिसला नाही. संध्याकाळी ठरलेल्या वेळी मागे परतावेच लागले. मावळतीचा सूर्य जंगलातल्या पाना फुलांना हलकेच स्पर्श करत जमिनीवर उतरलेल्या सावल्यांना
आणखी गडद करत होता.
अतुलदादाचे अनुभव ऐकणे आणि त्याने काढलेले फोटो बघणे हा एक वेगळाच अनुभव आहे. जंगल माणसाला किती आणि काय देऊ शकते याची कल्पना येते. वाघ टिकला तर माणूस टिकेल हे त्याचे म्हणणे त्याच्या बोलण्यातून उलगडत जाते. त्याच्या बोलण्यातून आणि त्याने टिपलेल्या क्षण चित्रांमधून निसर्गाचे एक वेगळेच रूप आपल्याला भेटायला येते.
आपली समज आणि आपली दृष्टी विस्तारण्याचे श्रेय या वन्यजीव अभ्यासाकांचेच!
पुढच्या दिवसाची पहाट. ह्या ट्रीपमधली ही शेवटची सफारी. कोलसारेंज मधल्या कोअर जंगलात.
सगळ्या वातावरणात जंगलाचा नाद. जणू सारे जंगलच आपल्यासोबत निघालेले. झाडं, पानं, ढग आणि वाराही. जंगलाचा गंध लपेटून आपण एकाग्र. मंत्रमुग्ध. मनाचा टीपकागद नकळत अनेक गोष्टी टिपून घेतो. स्वच्छ मोकळ्या हवेतला ताजा श्वास. खोल खोल देहात झिरपत जाणारा गारवा. वाऱ्यावर लहरत जाणारे पानच होऊन जातो आपण! इतके हलके होत जंगलाचा एक भाग होऊन जावं इतरांसारखंच आपणही, असं वाटायला लागतं आतून.
अनेक पक्षी दिसतात. काही आता ओळखू यायला लागले आहेत. दूरवरून टकाचोर साद घालतोय.
उंच झाडांच्या बेचक्यातून सूर्याचा तांबूस लाल गोळा हलकेच वर आला. थोड्याच वेळात सगळा आसमंत लालसर पिवळ्या सोनसळी रंगात न्हाहून निघाला. निलपंख आणि मोर तर आज जागोजागी दिसत होते. भरारी घेतांना निळ्या पंखांचे अद्भुत लावण्य क्षणभर दिसे. पक्षांची, फुलपाखरांची एक वेगळीच दुनिया आहे. प्रत्येक सजीवाचं अस्तित्व एकदुसऱ्यावर अवलंबून. म्हणून त्याचं असणं आणि टिकून राहणं महत्वाचं. सांबर, चितळ, नीलगायी, रानगवे कळपाकळपाने तर कधी एकटेदुकटेही दिसत होते. जराशा उतारावरून जातांना समोरचा दुतर्फा झाडांचा रस्ता बघून कुणा चित्रकाराने काढलेल्या चित्रात नकळत सदेह शिरल्याचा भास व्हावा.


जणू कॅनव्हासवर जिवंत झालेला निसर्ग! झाडांच्या पाठीमागून झिरपणाऱ्या सूर्यप्रकाशाने सोनसळी झळाळून गेलेला रस्ता. रम्य, आनंदी आपल्यावरच लुब्ध होऊन दोन्ही हात पसरून आपले  स्वागत करणारे जंगल समोर. मन हरखून गेले..इतक्यात दूरवर एक गाडी रस्त्यात थांबलेली दिसली म्हणून आम्ही घाईत तिथे पोहोचलो तर समोरच एक जंगली कुत्रा होता. आजूबाजूला बघितले तर बाजूच्या झुडूपांमधून सहा सात आणखी आकार उमटले. आम्ही सर्व अगदी शांत, स्तब्ध. सगळी मंडळी रस्त्यावर आली. थोड्यावेळ रेंगाळून हळूहळू पुन्हा झुडूपात दिसेनाशी झाली.

पुन्हा एका पाणवठ्याजवळ चार पाच गाड्या उभ्या होत्या तिथे येऊन थांबलो. छोटंसं तळं. बाजूने झाडी. वाघोबांची वाट बघितली पण त्यापेक्षाही समोर दिसणारं दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं इतकं सुंदर होतं. अनेक पक्षी ये-जा करत होते. इतकं शांत आणि प्रसन्न वाटत होतं की तो क्षण संपूच नये. पण परतावं तर लागणारंच.
आम्ही परतलो. निसर्गाचे जमतील तेव्हढे विभ्रम डोळ्यांच्या आणि कॅमेऱ्याच्या चौकटीत आम्ही पकडले खरे. पण निसर्गाची हाक आता थेट हृदयातच रुजली आहे! ती वेळोवेळी साद घालेल, हिरवाईच्या अनेक छटा लेवून गवताची पाती मनावर उमलून येतील आणि पावलांना लाल मातीच्या रंगाचा मोह पडेल.