रविवार, २२ एप्रिल, २०१८

सहज सोपं जगणं!





                                                  सहज सोपं जगणं!
  

कोण आहात तुम्ही? ओळखलं आहे कधी स्वतःला?
आहे ओळख स्वतःशी?
हा काय प्रश्न झाला का? असं वाटतंय ना?
मग डोळे मिटून क्षणभर थांबून विचारा बरं हा प्रश्न स्वतःला खरंच..
तुम्ही म्हणजे काही तुमचं असणं नाही आणि दिसणं देखील नाही.
तुम्ही म्हणजे तुमचं मन नाही आणि बुद्धी देखील नाही
तुम्ही म्हणजे तुमचे विचार?...छे! ते पण नाहीत.
तुम्ही म्हणजे तुमची स्वप्नं, ध्येय,आकांक्षा...?नाही..ते ही नाही!!
यापैकी काहीही म्हणजे तुम्ही नाहीच...हे कसं शक्य आहे..नाही का?
तर तुम्ही आहात केवळप्रतिक्रिया आणिप्रतिसाद
आपल्या आजूबाजूला असलेल्या जगाबद्दल,माणसांबद्दल,चराचराबद्दल आणि घटनांबद्दल असलेली प्रतिक्रिया आणि त्यावर दिलेला प्रतिसाद म्हणजे आपण!
आईच्या गर्भात रुजण्यापासून  सुरु होतो हा प्रवास.
स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवही नसते त्यावेळी.
तरी प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मात्र असतो.
सुरुवातीच्या आपल्या प्रतिक्रिया जैविक प्रेरणांवर आधारित असतात.
बाकीचे संदर्भ मनावर उमटणाऱ्या अनुभवांच्या ठशांवरून जमवत जातो आपण.
माहिती,अनुभव ,ज्ञान आणि शिकवण यातून संचय जमत रहातो आठवणींचा.
कोणताही नवा अनुभव घेतांना या संचयातील ज्ञान बऱ्याच प्रमाणात वापरतो आपण.
लहान मूल मोठे होत असतांना शिकते कसे आणि प्रतिक्रिया देते कसे हे बघितले की सहज समजेल हा प्रवास.
हे सगळं लिहिण्यामागचा उद्देश हा की आपण नवीन पिढी घडवत असतो आणि जर आपल्याला स्वतःबद्दलच पुरेसे माहीत नसेल नवीन पिढी कशी घडवू शकतो आपण समर्थपणे?
माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीकडे, जी लहान मुलांची तज्ञ आहे, एकदा एक आईबाबा आपल्या वर्षभराच्या छोट्या बाळाला घेऊन आले..त्यांची तक्रार एकच की.. बाळ खूप रडतं..त्यांनी त्याला अनेक डॉक्टरांना दाखवलं. त्या छोट्याशा जीवाच्या सगळ्या महागड्या तपासण्या करून झाल्या. विश्वास नव्हता पण अंगारे, धुपारे आणि नवस पण बोलून झाले. दृष्ट तर रोजच काढत होते.पण त्याचं रडणं काही कमी झालं नाही..ते झोपेल तितकीच त्याला विश्रांती..उठलं की रडणं सुरु..घरातले सगळेच वैतागले..समजेना ना..याला होतंय काय नेमकं?
संध्याकाळच्या ओपीडीला ते घेऊन आले बाळाला.आजी,आजोबा,मावशी आणि बाळाचे आई-बाबा असे सगळे आले होते आणि त्यांचा नंबर लागेपर्यंत बाळ या हातातून त्या हातात पण रडतेच आहे अशा स्थितीत.
त्यांचा नंबर लागला आणि हातात फाईल चा गठ्ठा घेऊन सगळं मंडळ केबिनमध्ये.
बाळ आईच्या कडेवर आणि कमालीचे अस्वस्थ. अर्थात रडत होतंच.
मैत्रिणीच्या पण लक्षात येईना की इतक्या सगळ्या तपासण्या केल्या आहेत आणि तरीही याचं रडणं सुरूच आहे तर आहे काय नेमकं? तिनेही आणखी काही प्रगत तपासण्या करायला सांगितल्या आणि काही औषधं लिहून दिली त्यांना.

दुसऱ्या दिवशी रविवार होता म्हणून ती घरात होती आणि दुपारी मुलांबरोबर मस्ती करतांना तिचा छोटा तीन वर्षांचा मुलगा तिला म्हणाला की तू मला कडेवर घे नाहीतर मी रडेन हं..असं म्हणून त्याने रडण्याची अक्टिंग केली..आणि त्याचं ते खोटं खोटं रडणं बघून हिला एकदम काहीतरी क्लिक झालं..


                             


आठ दिवसांनी ते लोकं बाळाला घेऊन पुन्हा आले. सांगितलेल्या तपासण्या अपेक्षेप्रमाणे नॉर्मल आलेल्या होत्या.

आता मैत्रिणीला फक्त बाळाच्या आईशी बोलायचं होतं..
आणि बोलता बोलता समजलेली माहिती अशी होती की त्याचं लग्न झालं त्यावेळी आई एकदम मोठ्या कंपनीत नोकरी करत होती.. त्यावेळी तिचं एक मोठं प्रोजेक्ट सुरु होतं जे तिचं ड्रीम प्रोजेक्ट होतं..लग्नानंतर नवरा-बायको दोघानाही आपल्या भावी आयुष्याचे काही प्लान्स केले होते..त्यात आपल्याला अजून पाच वर्षांनी मूल हवं हे पण होतं.. पण झालं काय की त्यांनी केलेलं प्लानिंग फसलं..आणि मग घरातल्या मोठ्यांच्या आग्रहाकरता प्रेग्नन्सी ठेवावी लागली.
इच्छा नव्हती पण मग नाईलाज झाला. नेमकं काय करायचं हा निर्णय आता दोघांच्या हातात राहिला नाही, त्याचापण त्रास झाला. जी गोष्ट अजून पाच वर्षांनी आनंदाने मान्य केली असती ती आता मनाविरुद्ध मान्य करावी लागली होती.
माझ्या प्रोजेक्टचं काय? हा विचार तिच्या मनाला अस्वस्थ करत होता..आणि मग संपूर्ण दिवस भरेपर्यंत तिच्या मनात हाच विचार की आपण घेतलेला हा निर्णय बरोबर आहे की चूक?
तिला त्रास काही होत नव्हता फारसा म्हणून ती अगदी शेवटपर्यंत ऑफिसला जात राहिली आणि बारीकसारीक तक्रारी आणि कौतुकं या कशाचसाठी कामातून उसंत नाही मिळाली तिला.
मनात सतत एकच विचार..धास्ती खरंतर की जी पाच वर्ष करिअर आणि आमच्या दोघांच्या साठी राखून ठेवली होती ते आता शक्य नाही..आणि आपण मानसिक दृष्ट्या तयार नसतांना ही नवी जबाबदारी मात्र आपल्याला घ्यावी लागतेय..
सीझर करावं लागलं आणि बाळाचा जन्म झाला.. घरातल्या सगळ्यांना खूप आनंद झाला. सगळ्यांचा आनंद बघून तिलाही छान वाटलं..बाळासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी शिकतांना आणि करतांना तिला नीट जमत नसे,अवघडल्यासारखं होई..
अभ्यासात आणि कामात हुशार असलेली ती इथे मात्र हतबल होऊन गेली. बाळ काही शांत नव्हतं..भुकेच्या आणि झोपेच्या वेळा सोडल्या तर रडून आकांत करे..घेऊन बसलं..त्याला खाली ठेवलं तरी शांत राहत नसे. आजीच्या कुशीत मात्र थोड्या वेळ तरी शांत होई आणि गाढ झोपे
काही दिवसात तिला समजेना की काम आणि या रडक्या बाळाची देखभाल सगळं कसं सांभाळायचं?
तरीही ती तिला जमेल तसं नीट करत होती सगळं..पण आता काळजी ही एकच होती तिची की सारखं रडत का असतं बाळ? कोणालाच काही कळत नाही, त्याला नेमकं काय होतंय? काळजीने जीव खालीवर झाला होता तिचा..
तिच्या कहाणीतून जे समजलं त्यातून डॉक्टर मैत्रिणीने तिला योग्य तो सल्ला दिला आणि काही व्हीडीओ क्लिप्स दिल्या बघायला.
आणि त्यानंतरच्या भेटीत त्याचं पूर्ण कुटुंब आलं तिला भेटण्यासाठी पेढे घेऊन.
बाळचं सतत रडणं खूप खूप कमी झालं होतं!
काय जादू झाली नेमकी?
बाळाच्या रडण्याचं आणि अस्वस्थ असण्याचं फक्त एक कारण होतं..त्याला असुरक्षित वाटत होतं!
आईच्या हालचालींमधून, वागण्यातून आपणनकोसेआहोत हे त्या छोट्या जीवाला पोहोचत होतं.
गर्भात असतांना आईचे विचार तरंग त्याच्यापर्यंत पोहोचत असावेत..आणि नंतर देखील आईच्या त्याला जवळ घेण्यात त्याला तिच्या मनातली ही भावना पोहोचत होती.
इतकासा जीव रडून आपला निषेध व्यक्त करत होता.
हे सगळं इतक्या जाणवण्याच्या पातळीवर घडत होतं आणि तरीही त्याचा परिणाम मात्र थेट झाला होता.
मग या सगळ्या गोष्टींचं भान आईला द्यावं लागलं. तिच्या लक्षात ज्या वेळी या गोष्टी आणून दिल्या त्या वेळी तिला कमालीचं खजील वाटलं. त्यांना नको असलेल्या वेळेत अचानक बाळाचं आगमन झालं या सगळ्यात बाळाचा काहीही दोष नव्हता.

                                         



 तिला सांगितल्याप्रमाणे आणि शिकवल्याप्रमाणे आणि आता आपली चूक नीट समजल्यामुळे आईने आपल्या विचारांमध्ये आणि बाळाशी वागण्यामध्ये पुरेपूर कष्ट घेऊन बदल घडवून आणला.

या घडलेल्या प्रसंगाने एक मात्र अगदी स्पष्ट समजले की आपण प्रत्यक्ष व्यक्त करो अथवा नाही आपल्या मनातल्या विचारांचे आणि आपल्या मानसिक अवस्थांचे प्रतिबिंब अगदी स्पष्टपणे आपल्याशी जवळून निगडित असलेल्या व्यक्तींवर परिणाम करते.
आईच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादातून बाळाने  आपणनकोसेआहोत हे बरोबर उचलले!
आणि स्वतःच्या आवाक्यात असलेली प्रतिक्रिया व्यक्त करून आपला निषेध देखील नोंदवला.
हा प्रसंग यासाठी वर्णन करून सांगितला की आपल्या प्रत्येक वागण्या मागच्या आपल्या मनातील भावना नक्की तपासून बघा.
योग्य वय झालं की लग्न करणे ही सामाजिक रित आहे पण ही जबाबदारी घेण्यासाठी आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम आणि तयार आहोत का याचे योग्य मूल्यमापन प्रत्येकाने जरूर करावे.
आपले भविष्यातील ध्येय आणि आपल्या प्राथमिकता यांचा अंदाज घेऊन नव्या जबाबदारीचा विचार करावा.
आदर्श आई-बाबा होण्यासाठी कोणतीही शाळा नाही पण त्याचा अभ्यास मात्र जरूर आहे.
बाळाच्या रडण्याचं कारण त्याची अगदी मुलभूत गरज होती.
आणि आजच्या काळात ती सहजासहजी लक्षात येणं दुर्मीळ होतं..कारण कोणत्याही गोष्टीत अवघडात अवघड विचार आधी केला जातो आणि अगदी सोपा,सहज विचार करण्याचं खूप कमी वेळा लक्षात येतं.
खरंतरजगणंहे सगळ्यात सोपं आणि नैसर्गिक आहे. पण कधी?
जर आपण आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद याबद्दल सजग असू तेव्हा!
त्यासाठी नेमकं काय करायचं?

भेटूया पुढच्या भागात!

तोपर्यंत...सहज रहा आणि सोपं जगा!!
डॉ. अंजली/अनन्या 
# आरसा 

mindmatteraa@gmail.com















































































 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा