रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

प्रेमस्वरूप ‘आई’



परवा सगळे मित्र-मैत्रिणी जमलो होतो एकत्र. समीरचं फार्महाउस फार छान आहे म्हणून सगळ्यांनी तिथेच भेटूया यावेळी असं ठरवलं आणि तसं समीरला सांगितलं, त्याला आनंद झाला. समीर स्वभावानं अबोल आहे पण सगळ्यांनी एकत्र जमायचं ठरवलं की तो सगळ्या गोष्टी बाजूला ठेऊन आवर्जून येतो.
त्या रात्रीही इतर सगळे पत्ते खेळायला बसले आणि बघता बघता त्यांचा डाव रंगला. समीर दुसऱ्या दिवशीच्या कामाच्या सूचना देत होता मागच्या अंगणात लोकांना आणि मी रातराणीच्या सुगंधात अडकून तिथेच खुर्चीवर बसले होते..
काम आटोपून तो माझ्याजवळ येऊन बसला आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या. विषय निघाला आमच्या लहानपणाबद्दल..

त्याच्या लहानपणाची पहिली आठवण आहे ती सकाळी उठतांना अंगावरून पांघरूण खसकन जोरात ओढून आईने झोपेतून उठवण्याची.आता कोणाच्या इतर काही आठवणी असू शकतात, पण याला कायम हीच आठवते.
बोलता बोलता समीरचा आवाज हळूवार झाला, मी आणि माझी बहीण..मी लहान, माझ्यापेक्षा चार वर्षाने मोठी बहीण.  
आमचा दिवस सुरु व्हायचा तो तिचा रुद्रावतार बघूनच.          

कळायचंच नाही, की तिला रोज इतका राग कशाचा येत असे.
बाबांचं ऑफिस दहा वाजता, ते पंधरा मिनिट आधी घराबाहेर पडत.
आमची शाळा दुपारची असे.
तरी उन्ह असो की थंडी, आम्ही साडे सहाला उठलोच पाहिजे, अशी तिची शिस्त.

सकाळी तिला घरातल्या सगळ्या कामांमध्ये मदत लागे.
आणि आम्ही उठून ती करत असलो तरी तिचा तोंडाचा पट्टा सुरूच असे.
“हजार वेळा सांगितलं की सकाळी अंथरुणात लोळत पडायचं नाही...” या वाक्या नंतरची इतर सगळी वाक्य रोज थोड्याफार फरकाने सारखीच असत.

तिच्या मनाप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करून, एकत्र अभ्यास करायचा आहे हे निमित्त सांगून रोज सकाळी मी माझ्या घराजवळच राहणाऱ्या मित्राकडे जाई. अभ्यास हा बहाणा असे खरंतर..मला त्यांच्या घरातलं सकाळचं वातावरण फार आवडे. छोटं घर होतं त्याचं..फक्त दोन रूम्स..आणि त्या घरात माणसे रहात सहा. मित्र, त्याच्या दोन बहिणी. आई-बाबा आणि त्यांची आजी. पण सकाळी त्यांच्या घरी सगळे एकत्र गप्पा मारत असत..

मी आणि मित्र एका कोपऱ्यात अभ्यास करत असू पण माझं मन त्या गप्पांमध्ये असे.
त्याची आई खूप प्रेमळ होती. ती घरातली कामे करतांना घरातल्या इतरांशी बोलत असे..विषय साधेसेच असत पण माझ्या लक्षात राहिलाय तो तिचा हसरा, प्रेमळ चेहरा..आणि तिचे काम करणारे हात.
कधी ती आम्हाला चहा देई, कधी काही खाऊ समोर ठेवे..
आम्ही काय अभ्यास करतोय, याकडे पण तिचं लक्ष असे अधूनमधून.
कधी त्याच्या दोन बहिणी आईशी काही बोलत असत आणि आई त्यांना त्यांनी काय केलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करत असे. कधी आजी तिच्याजवळ बसून तिला आपल्याला काय होतंय, हे सांगत असे आणि आई तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकून घेत असे..
कधी बाबा आणि ती एकमेकांशी घरातल्या काही गोष्टींवरून गप्पा मारत असत.
आणि यापैकी काही करत नसेल ना त्यावेळी ती हसतमुख, प्रसन्न आणि शांत चेहऱ्याने काम करत असे.

मी एकदाही त्यांच्या घरात मोठ्याने आवाज ऐकला नाही. मला खूप आवडायचं ते वातावरण.
मला कोणी माझ्या मनावर मोरपीस फिरवत आहे असे वाटे.. हळूहळू माझं मन शांत होत जाई..
लहानपणाचा विचार मनात आला ना की सकाळच्या वेळी त्यांच्या घरात असलेल्या त्या वातावरणातून मिळालेली स्निघ ऊब अजूनही मला आतून उर्जा देते!  
कसं ना प्रत्येकाच्या आत अशा इवल्या इवल्या प्रकाशाच्या पणत्या अखंड तेवत असतात!
आणि त्यांचं असणं आपल्यासाठी किती अश्वासक असतं आपल्या आयुष्यात.
आईने रोज सकाळी झोपेतून उठवणं...म्हटलं तर अगदी साधीशी गोष्ट.
पण किती जवळची असते मुलांच्या भावविश्वाशी.
  


मित्राच्या घरातल्या वातावरणातून स्वतःसाठी शांततेचे परागकण वेचणारा समीर..आता मला आपलेपणा वाटायला लागला त्याच्याबद्दल.
कारण ‘त्याच्या घरी आहे ते माझ्या घरी का नाही’..असा विचार जरी त्याच्या मनात आला असता तर?
परिस्थिती आपल्या हातात नसते पण तिच्यातून स्वतःसाठी काय निवडायचं हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं!

याचा अर्थ समीरची आई चांगलं वागत नव्हती असं नाही, तिचा स्वतःचा दिवस असा सुरु होत असेल तर ती स्वतः किती त्रासात असू शकेल...काय माहीत तिला कसला त्रास होत असे ते.
कदाचित तिला त्यावेळी मदतीची गरज असेल..हे कोणाला कधी कळलंच नाही!
असं माझ्या मनात येतंय तोच समीर म्हणाला, अगं तिचा स्वभावच तसा होता. सहनशक्ती कमी होती तिच्याकडे.

फार पट्कन राग यायचा तिला. अर्थात नंतर नंतर वयोमानाप्रमाणे फरक पडला तिच्यात बराच. आता तर ती एक प्रेमळ आजी आहे..असं म्हणून समीर हसला..
आणि लगेच पुढे म्हणाला..  
पण आमचं लहानपण तर निघून गेलं तोपर्यंत...
तुला माहितीये? मी आणि माझी बहीण दोघांनीही त्याचवेळी ठरवलं की आपल्या मुलांशी असं वागायचं नाही कधी.

कोणी मनातलं काही सांगायला लागलं की तो जे बोलतोय त्यापेक्षा त्याचे डोळे,आवाज आणि हावभाव जास्त बोलके असतात.
मलाही अंदाज आला की फक्त झोपेतून उठवण्यापुरतेच मर्यादित लहानपणाचे अनुभव नसावेत.

कोणीतरी हाक मारली म्हणून आम्ही दोघेही उठून ग्रुपमध्ये जाऊन बसलो.
आमच्या दोघांमधला मैत्रीचा एक धागा आणखी घट्ट झालेला जाणवला.

“आई” मुलांच्या भावविश्वाशी जोडलं गेलेलं सगळ्यात जवळचं नातं..
या नात्यातला अनुभव ठरवतो मुलांच्या आयुष्यातला भावनांचा प्रवास.

म्हणून मुलांना जन्म देण्या आधीच प्रत्येकीने विचार करायला हवा की आई होण्यासाठी माझ्या मनाची मशागत पूर्ण झाली आहे का?

कारण मुलांना जन्म देणं वेगळं आणि “आई” होणं वेगळं..
जन्म देणं ही केवळ साधी नैसर्गिक घटना आहे. त्या अर्थाने आई कोणालाही होता येतं.

पण जन्म दिल्यानंतर सुरु होतो तो एक प्रवास आहे.
त्यातून ‘आईपण’ घडत जातं. त्या अर्थाने ‘आई’ हा शब्द म्हणजे केवळ व्यक्ती नाही.
तर ‘वृत्ती’ आहे..

हे एकदा समजलं ना तर “आई” कोणालाही होता येतं..
‘आई’ ला आणि ‘बाबां’ना देखील!  





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा