मंगळवार, १० मार्च, २०१५

कोष मखमली


कोष मखमली तलम धागे
घट्ट विणीने विणले मी जग  
उभे नि आडवे पोत तयाचे
रंगांचे गहिरेपणही अलग  

कुठे सुखाची गडद निळाई
पालवीतली कोवळी पाने
मातीच्या रंगात मिसळली
हलकेच विरघळणारी मने

अंधार घुसमटता ओला
उन्ह पेरले त्यात जरासे
दाह सोसून मातीखाली         
हळूवार तडकले बीज कठीणसे  

सुखदु:खाची किनार साधी
नाही भपका भरजरीपण
काही राठपण घोंगडीतले
गोधडीतली मऊ ऊब पण  

माझे माझे म्हणता मीपण
विरले अलगद नुरली जाणीव
वस्त्र चिमुकले हलके हलके
गळून पडले विशुद्ध नेणीव!
-अनन्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा