सोमवार, २७ ऑक्टोबर, २०१४

गोष्टी घडवणारा माणूस!



ही गोष्ट आहे अशा एका माणसाची, ज्याचा गोष्टी सांगण्यावर नाही तर गोष्टी घडवण्यावर विश्वास आहे. ज्याचा वारसाच मुळी गोष्टी घडवणाऱ्या माणसांचा आहे! माणसातल्या माणूसपणाची ओळख सांगणाऱ्या गोष्टी.माणसातल्या माणसाशी नातं जोडणाऱ्या गोष्टी. त्यांचं नातं शब्दांशी नाही तर ते आहे कृतीशी.




डॉ. विकास आमटे,

आज त्यांचा वाढदिवस! त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला वेध. 


आनंदवन! आज अनेकांच्या मनात आनंदाचा, सौख्याचा ठेवा निर्माण करणारी ही भूमी.
बाबा आमटे आणि साधनाताई आमटेंनी आपल्या कठोर साधनेतून फुलवलेले हे नंदनवन.
आज या आनंदवनात साधारणपणे १८०० कुष्ठरोगी उपचार घेत आहेत. महारोगी सेवा समिती प्रकल्पातून फक्त कुष्ठरोगीच नव्हे तर अंध, अपंग, अनाथ, वृद्ध अशा अनेक दु:खी-कष्टी लोकांचा उपचार,सांभाळ आणि स्वयंरोजगारातून पुनर्वसन अशा जवळपास ५००० लोकांसाठी आनंदवन आज आपले घर आहे. ‘कोणालाही नाही म्हणायचे नाही’ हे म्हटले तर साधे वाक्य आहे केवळ. पण ते आचरणात आणण्यासाठी करावे लागणारे कष्ट आणि सातत्य आनंदवनातल्या प्रत्येक सदस्यात रुजवण्यासाठी प्रयत्न करणारी व्यक्ती कोणी अवलिया नाही तर या साध्या वाक्याइतकाच एक साधा माणूस आहे, विकास आमटे! बाबा आमटेंनंतरची पुढची पिढी. श्रमाची प्रतिष्ठा आणि साहसी वृत्ती हा त्यांचा कौटुंबिक वारसा. आपल्या रोजच्या जगण्यातून, व्यवहारातून कृतीशील जगण्याचा संस्कार आपल्या सहकार्यांवर, सोबत्यांवर करणारे सर्वांचे आवडते असलेले विकासभाऊ! सगळ्या आनंदवनाचे भाऊ!

त्यांच्या नावातच ‘विकास’ आहे! प्रसिद्धी, पैसा आणि प्रतिष्ठा या मानवी विकासाच्या आजच्या सर्वमान्य व्याख्या. ज्यासाठी माणूस जीवापाड कष्ट घेतो आणि आपले संपूर्ण आयुष्य वेचतो. पण या अशा लौकिक अर्थाने असलेल्या विकासापासून हजारो योजने दूर राहणेच भाऊंना प्रिय. विकासाचा हा अर्थ आपल्या स्वत:च्या आचरणातून पूर्णपणे बदलवून टाकून ‘विकास म्हणजे परिवर्तन’ ही साधीसुधी व्याख्या जगणारा एक साधा माणूस म्हणजे विकास आमटे. पडीक जमिनीवर आनंदवन फुलवणाऱ्या अनेक हातांपैकी एक हात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रेमाच्या,भावनेच्या आणि मानव्याच्या नाजूक तरीही बळकट नात्याने सगळ्या आनंदवनाला जोडणारा एक दुवा आहेत विकासभाऊ म्हणजे. 

आनंदवनात आलेल्या आजारी, अनाथ लोकांसाठी जगणं म्हणजे जगणं नसतंच तर त्यांच्या वाट्याला वास्तव येतं तेच मुळी जगण्याचा केवळ भास घेऊन. घरात, बाहेर सगळीकडेच केवळ उपेक्षा वाटेला आलेले असे जीव आजही पंचक्रोशीतून आनंदवनाच्या आश्रयाला येतात. त्यांना सामावून घेण्यासाठी, आधार देण्यासाठी आनंदवन सदैव तत्पर असते. आनंदवनाच्या पालकत्वाची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर पेलणाऱ्या विकास भाऊंचे मन त्यांना केवळ आधाराचा हात देऊन समाधान पावत नाही तर अशा अनेक लोकांच्या हातांना आनंदाचा ध्यास मिळावा म्हणून अनेक कल्पक योजना सुद्धा राबवते. जगण्यावरची श्रद्धा गमावलेले आणि निराशेच्या अंधकारात मार्ग हरवलेले जीव आनंदवनात येतात तेव्हा त्यांची अवस्था बघवत नाही पण इथे त्यांच्या शरीराच्या उपचारा बरोबरच त्यांच्या मनावरच्या घावावरही फुंकर मारली जाते. प्रत्येकाच्या मनातल्या सुप्त विजिगीषेवर साचलेली राख झाडून टाकून त्यांच्यात उन्मेषाची ठिणगी जागी करण्याचे काम आनंदवनात कधी होतं आणि कोणाकडून होतं हे समजत देखील नाही.

वातावरणातला कमालीचा साधेपणा, करुणा आणि सतत बळ पुरवणारी आंतरिक ऊर्जा इथे प्रत्येकाच्या मनात अखंड तेवत राहणारा एक दिवा उजळवते. त्याच प्रकाशात मग प्रत्येकाला आपला मार्ग स्वच्छपणे सापडतो. आणि साधेपणाने जगणाऱ्या लोकांना तेही पुरेसे असते नाही का? या प्रकाशात त्याचं स्वत:पुरतं असलेलं विश्व आधी उजळतं, आपल्यातलं आंतरिक बळ त्यांना उमगतं. आपल्या आतल्या सौंदर्याची जाणीव होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि त्यांचं जगणं सुंदर होतं. जे त्यांनी आपल्या आधीच्या आयुष्यात गमावलेलं आहे ते मुळात सुंदर नव्हतंच मुळी म्हणूनच ते आपल्यापासून दुरावलं याची त्यांना जाण येते आणि असा सुंदरतेचा खरा अर्थ कमावलेली नजर आपल्यातल्या व्यंगावर, उणिवेवर मात करून अगदी सहजपणे आपलं आयुष्य इतरांना समर्पित करू शकते. मानवतेच्या कार्याला हजारो हातांचं बळ मिळतं ते असं. विकास भाऊंनी अशी शेकडो माणसे घडवली, तयार केली. आपल्या सारखे अनेक लोक तयार होणं यातच त्या व्यक्तीच्या कार्याचा सन्मान, गौरव सामावलाय असं नाही वाटत तुम्हालाही?

आनंदवनात गेली ३२ वर्षे सतत काहीनाकाही सामाजिक कार्य करणारे सदाशिव ताजने आज संधीनिकेतन या आनंदवनातील (हातमाग,यंत्रमाग हस्तकला,बेकरी,प्रिंटींग,वेल्डिंग हे व्यवसाय असलेला प्रकल्प) मोठ्या प्रकल्पाचे अधीक्षक आहेत. संधीनिकेतनचे ताजने हे पहिले विद्यार्थी. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यातून त्यांनी आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करून इतरांनाही प्रेरणा दिली आहे.

सुधाकर कडू हे देखील आपल्या कुष्ठरोगावर मात करून आनंदवन अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून आज कार्यरत आहेत.
कुष्ठरोगी असलेले गजानन वसू आज आनंदवन डेअरीचं संपूर्ण काम सांभाळतात.
कधीकाळी जी माणसे कोणीच नव्हती, समाजाकडून ठोकरली गेलेली आणि आपला आत्मसन्मान गमावून बसलेली ही माणसे आज दुसऱ्या उपेक्षित जीवांच्या आयुष्यात प्रकाशाची बीजे रुजवीत सहजपणे जगत आहेत.      

परिवर्तन हे असं आतून उमलतं इथल्या प्रत्येकाच्या आयुष्यात. भाऊ यासाठी पूरक, पोषक वातावरण कसं तयार होईल याच एका ध्यासात असतात सतत.परिस्थितीने या लोकांसमोर उभे केलेले अडथळे दूर करण्यासाठी काय काय करता येईल यासाठी त्यांच्या आतला सुप्त तंत्रज्ञ अव्याहतपणे काम करत असतो. त्यांची बुद्धी सतत नव्या नव्या आव्हानांचा वेध घेत असते. आजच्या युगाशी सुसंगत अशी एक विकसित दृष्टी त्यांच्याकडे आहे. त्यातूनच बाबांच्या पाठीमागेही आनंदवनाचे काम आणि विस्तार सतत वाढतो आहे. “ मी बाबांच्या स्वप्नांचा ठेकेदार आहे” असे निर्भीडपणे सांगत त्यांनी हा व्याप नुसता सांभाळला नाही तर दूरदृष्टीने हा व्याप सांभाळणारे हात त्यांनी वाढवले. यवतमाळ जिल्ह्यातील झरीझामणी पर्यंत हा विस्तार त्यांनी वाढवला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या या गावात छोटी छोटी पिके काढून आपण आपले पोट भरू शकतो ही संकल्पनाच नव्हती. जमिनी नापीक, भौगोलिकदृष्ट्या रखरखाट..या परिस्थितीवरही मात करता येऊ शकते हे भाऊंनी सप्रमाण सिद्ध केले. निकामी झालेले गाड्यांचे टायर वापरून पावसाचे पाणी अडवणारा बंधारा बांधता येतो, पाणी अडवता येते आणि त्या पाण्यावर भाजीपाला पिकवून स्वयंपूर्ण होता येते, हे त्यांनी स्वत: प्रयोग करून दाखवून दिले. झरीझामणी गावात लोकांनी एकत्र येऊन श्रमशक्तीतून शेततळी तयार केली आहेत. आत्महत्येच्या मानसिकतेवर मात करणारा हा कृतीशील, सकारात्मक पर्याय प्रत्यक्ष सिद्ध झालेला आहे.   


आनंदवनातील जमीन आणि पाण्याचे तंत्रशुद्ध व्यवस्थापन करण्यासाठी भाऊ वेगळ्या आणि आपण तयार केलेल्या पद्धतींचा वापर करतात. आनंदवनातील ४६५ एकर जमीन शेतीखाली आहे. इथे नेहमी काहीनाकाही नवीन घडत असते. आनंदवनात घरे तयार करतांना लाकूड आणि लोखंड यांचा कमीतकमी वापर केला जातो. प्लास्टिकचे कागद, वस्तू इथे विटा तयार करण्याच्या कामासाठी वापरल्या जातात. या विटा प्रचंड प्रमाणात मजबूत तर आहेतच शिवाय घर बांधण्याचा खर्चही कमी येतो आणि वेळ पण वाचतो. शिवाय घराचे छत सुद्धा slab न करता उतरत्या बांधणीचे करून पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची सोयदेखील या घरात आहे. आनंदवन परिसर खूप मोठा आहे. इथली सांडपाण्याची व्यवस्था, मल नि:सारणाची व्यवस्था अतिशय कल्पकतेने केलेली आहे. कुठल्याही प्रकारच्या दुर्गंधीपासून पूर्ण मुक्त आणि स्वच्छ असा हा परिसर आहे. या भागात उगवणाऱ्या प्रथिनयुक्त गवतावर इथली गायी-गुरे धष्टपुष्ट झाली आहेत आणि डेअरीचा खूप मोठा व्यवसाय आनंदवनात उभा राहिला आहे. अशी पर्यावरणपूरक घरं, परिसर आणि ती बांधण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य, त्यांचे रंग हे सगळे भोवतालच्या निसर्गाशी सुसंगत. स्वच्छ. पर्यावरणाचा तोल आणि ताल सांभाळत. या घरात सगळ्यांनी मिळून एकत्र रहायचं, एकत्र काम करायचं आणि प्रत्यक्ष काम करता करता शिकायचं. उपलब्ध संसाधनांचा कमीतकमी वापर करून एकमेकांशी जुळवून घेऊन एकदिलाने राहता राहता प्रत्येकाची व्यक्तिगत सुखदु:खे आनंदवनात अगदी बोथट होऊन जातात.

आनंदवनातल्या प्रत्येक सदस्याला बाहेरच्या समाजात आपली ओळख निर्माण करता यावी यासाठी भाऊ स्वत: सतर्क असतात. आज इथल्या लोकांचे काम बाहेरच्या जगात जाऊन पोहोचले आहे. पण यासाठी करावा लागलेला संघर्ष अजूनही पूर्णपणे संपलेला नाही.पूर्वी तर कुष्ठरोग्यांनी तयार केलेल्या वस्तू, कपडे यांना कोणी हात देखील लावत नसे. शरीराचा कुष्ठरोग उपचाराने घालवता तरी येतो पण मनाचा कुष्ठरोग घालवण्यासाठी अजूनही समाजाचे विचार प्रबोधन करावे लागते याची खंत विकास आमटेंना आहे. समाजाने सर्वार्थाने कुष्ठरोग्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे यासाठी प्रसंगी ते परखडपणे आणि तीव्र शब्दात आपल्या भावना बोलून दाखवतात.      
सरळ आखून दिलेल्या वाटेवरून चालतांनाही अडखळून धडपडणारे आपण. आपण करत असलेलं काम चालू ठेवावं की थांबवावं...चालू ठेवलं तरी समोर काही भलं, आशादायक घडतांना आपल्याला दिसत नाही. रोजचं आयुष्य जगतांनाही आपल्याला खंडीभर प्रश्न पडतात.त्यांची उत्तरं सापडत नाहीत. मनाचा गोंधळ उडतो, निराशा दाटून येते. नाकासमोर चालणाऱ्या आपल्या आयुष्याचे कसले आलेत संघर्ष आणि पेच? तरीही आपण अस्वस्थ असतो, अस्वस्थ जगतो..आनंदवनातल्या वंचित, उपेक्षित लोकांचे अर्थपूर्ण जगणे बघितले, अनुभवले की आपल्या जाणीवेच्या कक्षाही रुंदावतात. इथल्या सर्जनशील वाटेवरचे प्रवासी त्यांच्या मनाच्या पणतीच्या प्रकाशात आपल्याला आपली वाट सापडू देतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाला विकासाचा अर्थ देणारा विकास विनम्रतेचा असतो, कामसू पणाचा असतो आणि समर्पित भावनेचा असतो! 

प्रकाश बाबा आमटे हा सिनेमा बघितला आणि मनात आले समाजाच्या प्रत्येक थरापर्यंत विषय आणि विचार पोहोचवण्याचे सिनेमा हे एक सशक्त माध्यम आहे. असे काम आणि हे काम करणारी लोकं आपलीच आहेत.आपल्या जवळपासच आहेत. आपल्यासारखीच आहेत आणि तरीही त्यांच्यात असलेल्या वेगळेपणाच्या आसपासही आपण फिरकू शकत नाही.

विकास बाबा आमटे हे देखील याच तोलामोलाचं आणखी एक नाव. आज ज्या स्वरुपात आनंदवनाचं काम विस्तार पावत आहे हा सगळा प्रवास त्यांच्यासाठी सहज सोपा मुळीच नव्हता.
अत्यंत प्रतिकुलतेतून समोर आलेल्या परिस्थितीला त्यांनी उत्तरं शोधली. समाजाच्या मुख्य प्रवाहात आनंदवनातील प्रत्येक घटक सहभागी व्हावा यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली.
आपल्या कामाबद्दल मिळणाऱ्या इतर कोणत्या पारितोषिकापेक्षाही आनंदवन आणि त्यातील समाजापासून दुरावलेले वंचित, उपेक्षित लोक समाजात पुन्हा एकरूप झालेले बघणे हे विकास भाऊंसाठी आयुष्याचे सार्थक आहे. आनंदवनातील आनंद आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपणही आपल्या मनाची आणि बुद्धीची दारे जाणीवपूर्वक उघडू या. जन्म आणि मृत्यू या दोन टिंबांमधून प्रवास करतांना प्रकाश आणि विकासाच्या या खडतर वाटा आपल्याला निदान समजून जरी घेता आल्या तरी पुष्कळ आहे.

विकासभाऊंना ६७ व्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्यांकडून विनम्र शुभेच्छा!

 

६ टिप्पण्या:

  1. Hi mahiti dilyabadal thank you. Vikas Amte khup motha kam ahe.
    Tyanchyavar pan movie nighala pahijel.

    उत्तर द्याहटवा
  2. तेजल,अनामिक,मानसी आणि भावना मनापासून आभार!
    आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवत जा. लिहिणे हा मनातील विचार झाला आणि प्रतिक्रिया हा संवाद!

    उत्तर द्याहटवा
  3. khup chan lihilay.. vikas amte baddal mi ya dhi vishesh kadhi vachala navhata..

    उत्तर द्याहटवा