गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

“का नाही...?”

का नाही वाढू शकत आपणही
झाडांसारखं? वेलींसारखं?
पावलाखालच्या जमिनीशी
नातं कायम ठेवून
आभाळाच्या दिशेने?

माझ्या फुलण्याचे नियम   
का बनवावेत दुसऱ्यांनी?
‘असण्याचा’ माझ्या
मीच अनभवू नये आनंद
इतकं पारखं व्हावं
मीच मला जगतांना?

पायाखालची जमीन
इतकी अस्थिर, इतकी अनिश्चित
झुकला तोल सावरण्याची
एकही संधी मिळू नये?
इतकं अधांतरी असावं का
जाणीवांनी जगतांना?

माझ्यातही आहेच आहे
मूळ सक्षम जगण्याचं
आभाळाच्या साक्षीनं
माझ्याच वेगात उमलण्याचं,
‘गुलाब’ नाही मी
‘जाई’ ‘जुई’ ‘चाफा’ही
नाव काही असेल नसेल
दखलही कोणी घेणार नाही
म्हणून काय माझे रूप
रंग, गंध, अस्तित्व
माझ्यासाठी असूच नये
माझं स्वत:चं जगणं?

माझ्या तालात माझे जगणे
हेच माझे जीवनगाणे
माझे असणे, माझे फुलणे
‘उत्सव’ दुसरा कुठला नाही.

खरच का नाही वाढू शकत आपणही...?   
झाडांसारखं? वेलींसारखं?  
-अनन्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा