Sunday, 13 May 2018

‘आई’ म्हणोन कोणी


                                                       ‘आई’ म्हणोन कोणी  

बोलता बोलता तिच्या टपोरे काळेभोर डोळे झाकोळले, गच्च भरून आले.
उच्चविद्याविभूषित, आर्किटेक्ट असलेल्या तिने अजिबात थांबवलं नाही स्वतःला..
भरून आलेल्या आभाळाला आज मनसोक्त बरसायचं होतं.
माझ्या व्यवसायात आज नाव आहे माझं.. माझी डिझाइन्स नावाजली गेली आहेत कितीवेळा..पण माझं हे यश कधीकधी इतकं लहान वाटतं ना मला!
काय हा असा आजार जडला आहे मला?
किती डॉक्टर झाले, सगळ्या तपासण्या झाल्या पण एकातही काही दोष नाही.
"
तुम्ही पुन्हा येण्याची गरज नाही. काहीही झालं नाहीये तुम्हाला.."असं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच दुसरा डॉक्टर गाठतो.. पण याचाही कंटाळा आला आहे आता मला.
या पोटदुखीपायी कामावर पण परिणाम होतो आहे आता..लक्षच लागत नाही माझं कशात..
जे पाहिजे ते देत नाहीये हे पोट,दुखणं देऊन मात्र जीव नकोसा केलाय माझा..
तिची बोलण्याची पद्धत आणि ती वापरत असलेले शब्द मी काळजीपूर्वक ऐकत होते.
तिच्या घरात ती, नवरा आणि सासू-सासरे.सुशिक्षित,सधन कुटुंब. लक्ष्मी आणि सरस्वती दोघींचा वरदहस्त.
लग्नाला जवळजवळ एक तप झालेलं.
सगळी नाती एकदम समजूतदार आणि सगळं एकदम गोड गोड असूनही पोट मात्र तरीही दुखत होतं.
चाळीशीकडे वय सरकते आहे ही चिंता तिचं मन विचलित करत होती.
मला नाही वाटत आता की आयुष्यात काहीही मिळवायचं राहिलेलं आहे. परिपूर्ण आणि सुखी, समाधानी आहे आयुष्य,दृष्ट लागण्याजोगं!
फक्त हा त्रास सोडला तर...तिने एक मोठा श्वास घेतला.
तिचे शब्द,चेहऱ्यावरील हावभाव, रंग आणि हाताच्या बोटांच्या हलचाली, अनेकवेळा बसण्याची पद्धत बदलणारी तिची पायांची हलचाल..यातून त्या क्षणी माझ्या समोर असलेल्या तिच्याबद्दल माहिती जमा होत होती.
सगळ्या सुरक्षित आणि समृद्ध थराआड असे काहीतरी होते जे तिला इथपर्यंत घेऊन आले होते.
जे हवे आहे ते मिळता जे काही मिळत होते, त्यासाठी हा सगळा त्रास होता!
मूल होऊ शकले नाही आणि आम्ही सगळ्यांनी ते सत्य अगदी मनापासून स्वीकारले आहे..दत्तक घेण्याचा विचार होता आमचा पण मग असे वाटले की समजा ते नाही चांगले वागले आणि कोणाच्याही मनात आले, की दत्तक आहे म्हणून असे निघाले, तर मला नाही आवडणार..असे ती म्हणाली..
लोकांच्या घरांच्या भिंती कलात्मकतेने सजवणारी ती किती अपरिपक्व धारणा मनात ठेवून स्वतःच्या शरीराचे आणि मनाचे डिझाईन स्वतःच बिघडवत होती!
दुसरे कोणी काही म्हणो म्हणो त्या आधीच ते असे म्हणाले तर..? हा विचार करून ती मनात त्याचे भयानक चित्र आधीच रंगवत होती!
दुसऱ्यांचे म्हणणे, दुसऱ्यांचे विचार आणि दुसऱ्यांना सोयीचं सुखाचं होईल असे घर सजवून देता देता ती स्वतःचे  आयुष्यपण दुसऱ्याच्या नजरेने बघत होती!
मूल होण्याबाबत तिला कोणीही काहीही खरंच म्हणाले नव्हते पण ते मनातल्या मनात माझ्याबद्दल तसा विचार नक्की करत असतील याची तिला खात्री होती!
खरंतर मूल होण्यातच स्त्री जन्माची परिपूर्णता आहे अशी धारणा तिच्याच मनात खोलवर अस्तित्वात होती..वरवर जरी तिने ती अजिबात स्वीकारली नाही तरीही.
                                                     


अनेक मुद्द्यांना समजावून देता,घेता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे आम्ही आलो.
'
मातृत्व' म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं इतकंच मर्यादित नाही.
मनात एखादी रचना अचानक सुचणं.. रंगांचा आणि आकारांचा एकमेकांत मेळ बसणं त्यातून चार भिंतींच्या मर्यादेत एक सुंदर, बोलकं,आश्वासक घर तयार होणं हे एक सृजन आहे..आणि ते तुझ्या मनात निर्माण होतं आणि मग तू ते प्रत्यक्षात उतरवते त्या अर्थाने तू त्या निर्मितीची 'आई' आहेस की!
चित्रकार,कवी,लेखक,फोटोग्राफर,शिल्पकार,गायक,वादक यांच्यापासून ते अगदी कुंभारापर्यंत.. सगळे सृजन आणि सर्जन करत असतात..आपली निर्मिती सगळ्यांना प्रिय असते ती का?
आणि ती कोणी हिरावून घेतली, तिच्यावर आपला हक्क सांगितला तर किती वेदना होतात, त्या का?
कारण त्यात एक 'मातृत्वभाव' असतो.
आई होण्यासाठी बाळ आपल्याच पोटातून आले पाहिजे असे नाही.
बाळ पोटातून आले तरी त्याच्याबद्दल वाटणारी माया मनातून, हृदयातून येते.

                                                       

आणि दत्तकच घ्यायला हवे असेही नाही. एकापेक्षा अनेक मुलांवर प्रेम करण्याची क्षमता आहे तुझ्या मनात.
आणि प्रेम करणाऱ्याने भिंती बांधायच्या नसतात तर मनातल्या भिंती तोडून विश्वाला जवळ करायचे असते..
ज्ञानेश्वरांना "माऊली" का म्हटलं सांग बरं?
हळूहळू या आर्किटेक्टच्या मनातल्या भिंती ढासळायला सुरवात झाली आहे हे माझ्या लक्षात आलं..
तिला गरज आहे तोपर्यंत अनेक गोष्टींवर आम्ही बोलू आणि त्यातून तिच्या साठी किती अनंत शक्यतांचे अवकाश खुले आहे हे आपोआप लक्षात येईल आता तिच्या.
तो शोध आणि प्रवास मात्र तिचा स्वतःचा असेल..
"
आई" आणि "बाप" होणं यात तुमचं कर्तृत्व काहीही नाही.
आईबापपण निभावणं जर जमलं, तर प्रत्येक स्त्री पुरुषातलं मातृत्व समजायला लागेल..
जगण्यातल्या निर्मितीचं हे मर्म ज्याला ज्याला समजलं त्या प्रत्येकाला आज मन:पूर्वक मातृदिनाच्या शुभेच्छा!!
© डॉ. अंजली/अनन्या
# आरसा
mindmatteraa@gmail.com
                                                     
                                       


 

No comments:

Post a Comment