शनिवार, १९ एप्रिल, २०१४

बहावा

बहाव्याने किती फुलावे         
अंगोपांगी हळद लेवून
सोनसकाळी ऊन कोवळे
खुलले कांचन अजूनच थोडे  

फांदी फांदी झुकली खाली
फुले हळदुल्या रंगात न्हाली    
हिरव्या हिरव्या देठात नव्याने   
लहर अनावर धावत आली.      

मत्त सुखाची लाट चहूकडे
रंगबावरे माझेही मन
अंगोपांगी फुलता कोणी
खुणावते मज वेडे होऊन

असे खुलावे, असे फुलावे
देहाचे अवघे भान हरावे                                
रंध्रात उमटले फुलणे, झुलणे
वेड तयाचे मला लागले!  


-अनन्या 

४ टिप्पण्या: