गुरुवार, १७ एप्रिल, २०१४

सान्तत्व

वाहत रहावे अखंड, अव्याहत
प्रत्येक क्षणाचे संचित घेऊन.

नसतेच कुठे सुरवात नेमकेपणाने 
आणि शेवटही आखून दिलेला

स्वच्छ ताज्या श्वासापुरताच
प्राण असतो बांधलेला.

श्वासाचे ताजेपण,
हवेसेपण,आसुसलेपण
काठोकाठ वाहते चैतन्य ओसंडून.

वाहू द्यावा वर्तमान
अनंत काळाचा संदर्भ लेवून.
जुन्या जाणत्या सान्तत्वाने

उमलू द्यावे स्वप्न उद्याचे
अलगद, आश्वासक.


-अनन्या 

1 टिप्पणी:

  1. वा!
    वाहत रहावे अखंड, अव्याहत
    प्रत्येक क्षणाचे संचित घेऊन.

    काळाचे संचित, पूर्वजन्मीचे संचित ही संकल्पना समाजात रुजलेली आहे. सामाजिकदृष्ट्या त्यांना अर्थ आहेच. वैयक्तिक संदर्भातही त्या अर्थपूर्ण ठरतात. क्षणाचे संचित हा नूतन विचार आस्वादकांना, साहित्यरसिकांना, मानसशास्त्रज्ञांना आव्हानात्मक व तितकाच मनोरंजकही. एकेक शब्द येतो आणि नवीन विचारदिशा देऊन जातो.
    अनन्या, छायाचित्रही गूढत्वाकडे घेऊन जाणारे. अफाट निसर्ग आणि माणूस लहान.

    उत्तर द्याहटवा